तीन दिवसांपूर्वी दक्षिण कोरीयात प्रवाशांना घेऊन जाणारे सेओल हे मोठे जहाज बुडल्याप्रकरणी जहाजाच्या कप्तानाला शनिवारी अटक करण्यात आली. कामात हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी तसेच सागरी नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या जहाजावर ४७२ प्रवासी होते. त्यापैकी ३२ जणांचा मृत्यू झाला असून इतर २७०  प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता प्रवाशांमध्ये मोठय़ा प्रमाणात शाळकरी मुलांचा समावेश असून सर्वाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पाणबुडय़ांनी बुडालेल्या जहाजात प्रथमच प्रवेश करून शोधकार्य सुरू केले आहे. मात्र आतमध्ये अंधार असून पाण्याचा वेगही अधिक असल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत.
बुडलेल्या जहाजाचा कप्तान ली जून सेओक (५२) आणि त्यांच्या दोन सहकारी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ली यांना अटक करण्यात आली असून कामातील हलगर्जीपणासह आणखी पाच आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
सहा हजार ८२५ टन वजनाच्या या महाकाय जहाजातून प्रवास करणारे आपले नातलग दुर्घटनेच्या तीन दिवसांनंतरही सुरक्षित असल्याची आशा त्यांच्या नातेवाइकांना आहे.
शुक्रवारी दोन पाणबुडे सामान ठेवण्याच्या कक्षात पोहोचले होते, अशी माहिती तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तर जहाजात अंधार असून पाण्याचा प्रवाह  वेगवान असल्यामुळे समोरच्या वस्तूही दिसत नसल्यामुळे शोधकार्यात अडथळे आल्याचे पाणबुडय़ांनी सांगितले.
जहाज बुडल्यानंतर तातडीने १७१ प्रवाशांना वाचवण्यात आले होते. मात्र त्यानंतर अद्याप कुणाला बाहेर काढण्यात यश आलेले नाही.
जहाजाच्या कप्तनाचा दावा
जहाजाचे कप्तान ली यांनी प्रवाशांना तातडीने जहाजातून उतरण्याच्या सूचना न केल्याच्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले आहे. जहाजाला दुर्घटना झाली तेव्हा आजूबाजूला ना मच्छीमारी नौका होत्या, ना मदतकार्य करणारे जहाज घटनास्थळी पोहोचले होते. त्यामुळे लोकांना जहाजाबाहेर काढण्यासंदंर्भात तातडीने निर्णय घेतला नाही. मात्र झालेल्या दुर्घटनेबद्दल आपल्याला दु:ख झाल्याचे ली म्हणाले.