अमेरिकेवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा

सेऊल : अमेरिकेचे राजदूत सेऊल भेटीवर आले असता उत्तर कोरियाने गुरुवारी दोन क्षेपणास्त्रे डागून त्यांचे स्वागत केले, असे दक्षिण कोरियाच्या लष्कराने म्हटले आहे.

केवळ एका आठवडय़ाच्या कालावधीत उत्तर कोरियाने दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र डागले आहे. अमेरिकेसमवेत सुरू असलेली आण्विक प्रश्नाबाबतची चर्चा सध्या थांबली असल्याने दबाव वाढविण्याचा प्रयत्न म्हणून ही क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

शनिवारीही उत्तर कोरियाने लष्करी कवायती कून क्षेपणास्त्रे डागली होती. त्यापैकी एक क्षेपणास्त्र मध्यम पल्ल्याचे होते, असे सूत्रांनी सांगितले. उत्तर कोरियाने २०१७ नंतर क्षेपणास्त्र डागले नव्हते. त्यानंतर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग ऊन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ऐतिहासिक चर्चा झाली होती.

अमेरिकेचे उत्तर कोरियासाठीचे विशेष प्रतिनिधी स्टीफन बीइगन हे बुधवारी रात्री सेऊलमध्ये आल्यानंतर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रे डागली. उत्तर कोरियाने मध्यम पल्ल्याची दोन क्षेपणास्त्रे डागल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.