दक्षिण कोरियात अलीकडेच झालेल्या फेरीबोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची संख्या आता ५०वर पोहोचली आहे. मृत प्रवाशांचा शोध घेणाऱ्या पाणबुडय़ांच्या पथकाने बोटीच्या अंतर्गत भागात कसून शोध घेतला.
या बोटीतून प्रवास करणाऱ्यांपैकी आतापर्यंत सुमारे २५० लोक बेपत्ता आहेत. सहलीसाठी जाणारे शाळकरी विद्यार्थी या बोटीत मोठय़ा संख्येने होते. त्यामुळे बोट खच्चून भरली होती. शोधकामाच्या प्रगतीसंबंधी प्रवाशांचे नातेवाईक कमालीचे नाराज झाले होते. मात्र, खराब हवामान आणि कमी दृश्यमानता यामुळे शोधकार्यात कमालीचे अडथळे येत होते.
दरम्यान, शनिवारी पुन्हा शोधकार्यास प्रारंभ झाला. हा शोध रविवारीही सुरू होता. त्यानंतर बोटीमधून १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृत प्रवाशांमध्ये २३ विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.