करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षिण कोरियाप्रमाणे दिल्लीमध्ये देखील अधिकाधिक नमुना चाचण्या केल्या जाणार आहेत. अनियमित स्वरूपाच्या (रॅण्डम) नमुना चाचण्या घेऊन जास्तीत जास्त करोनाबाधितांना शोधून काढणे आणि त्यांच्यावर उपचार करणे, ही पद्धत अवलंबली जाणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी मंगळवारी सांगितले.

अनियमित स्वरूपाच्या (रॅण्डम) नमुना चाचण्या प्रामुख्याने ‘हॉटस्पॉट’मध्ये केल्या जातील पण, त्याची व्याप्ती वाढवली जाऊ शकते. या पद्धतीचा वापर करून दक्षिण कोरियाने करोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. जलद नमुना चाचण्यांना ‘आयसीएमआर’ने परवानगी दिल्यामुळे किमान एक लाख जलद नमुना चाचण्या दिल्लीभर केल्या जाणार आहेत. त्यासाठी लागणारे किट शुक्रवापर्यंत उपलब्ध होतील, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.

करोना नियंत्रणासाठी पाचसूत्री कार्यक्रम दिल्ली सरकारकडून राबवला जाणार आहे. कुठल्या कुठल्या घरात करोनाची बाधा झाली आहे हे समजल्याशिवाय करोना आटोक्यात येणार नाही. त्यामुळे अधिकाधिक नमुना चाचण्या केल्या जातील. दक्षिण कोरियाने करोनाबधित एकेका व्यक्तीला शोधून काढले, त्याच्यावर उपचार केले. तसे केले नाही तर करोनाचा प्रादुर्भाव होत राहील, असे केजरीवाल म्हणाले.

आत्तापर्यंत देशभरात ‘हॉटस्पॉट’वर लक्ष केंद्रीत करून त्या भागातील करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या रहिवाशांच्या नमुना चाचण्या करण्यावर भर देण्यात आला होता. त्यामुळे सरसकट नमुना चाचण्या घेतल्या गेल्या नाहीत. पण, दिल्लीत नमुना चाचण्यांचा दक्षिण कोरिया पॅटर्न राबवला जाणार आहे. या पद्धतीने दक्षिण कोरियात करोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला होता. जलद नमुना चाचण्या आधी निजामुद्दीन आणि दिलशाद बाग या ‘हॉटस्पॉट’मध्ये होतील. तिथल्या कुठल्याही रहिवाशांवर ही चाचणी केली जाईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.

केजरीवाल यांची पाचसूत्री कृती योजना

दिल्लीत करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पाचसूत्री कृती योजना जाहीर केली. शहरात जेथे करोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे तेथे एक लाख लोकांची करोना चाचणी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेण्ट, टीम-वर्क आणि ट्रॅकिंग-मॉनिटरिंग अशी पाचसूत्री कृती योजना आखण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जवळपास ३० हजार करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी योजना आखण्यात आली असून आणखी आठ हजार खाटांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. लोकनायक जयप्रकाश नारायण, जी. बी. पंत, राजीव गांधी सुपर स्पेशालिटी या रुग्णालयांमध्ये करोनावरच उपचार होतील, असे केजरीवाल यांनी व्हिडीओद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. सध्या शहरातील रुग्णालयांमधील २९५० खाटा करोनाबाधित रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यास दिल्ली सरकार हॉटेलांमधील १२ हजार खोल्या ताब्यात घेणार आहे, असेही ते म्हणाले. तबलिगी जमात कार्यक्रमाला हजर राहिलेले नजीकच्या परिसरात फिरले होते का याची खातरजमा करण्यासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक पोलिसांना देण्यात येणार आहेत, असेही केजरीवाल म्हणाले.