जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या सॅमसंग कंपनीचे प्रमुख जे वाय ली यांना आज भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक झाल्यानंतर सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सची शेअर बाजारात घसरण झाली आहे.  सॅमसंग कंपनीचे शेअर १.२ टक्क्यांनी घसरले आहेत.

काय आहे प्रकरण?

तत्कालीन राष्ट्रपती पार्क गुन हे यांना ४० दशलक्ष डॉलरची (२६० कोटी रुपये) लाच देण्याचा प्रयत्न ली यांनी केला होता. दोन कंपन्यांचे विलीनीकरण करण्यासाठी त्यांना राष्ट्रपतीच्या मदतीची आवश्यकता होती. त्यामुळेच त्यांनी पार्क गुन यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता.

दक्षिण कोरियातील सर्वात मोठी कंपनी

सॅमसंग कंपनी ही दक्षिण कोरियामधील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीची एकूण किंमत ४०,००० कोटी रुपये इतकी आहे. सॅमसंगचा दक्षिण कोरियामध्ये दबदबा आहे. सॅमसंग ही कंपनी ली यांच्या आजोबांनी स्थापन केली होती. अत्यंत साधारण कुटुंबातून आलेल्या ली यांच्या आजोबांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात किराणा मालाच्या दुकानापासून केली होती. हळुहळु व्यवसायाचा विस्तार झाला आणि सॅमसंग एक मोठी कंपनी म्हणून गणली जाऊ लागली. आपल्या पैशांचा वापर करुन अधिकारी आणि राजकारण्यांवर दबाव आणण्याचे आरोप ली यांच्या वडिलांवर आणि आजोबांवर देखील झाले होते. सरकारी नियमांमध्ये फेरफार करणे, कर बुडवणे यासारखे आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आले होते परंतु त्यांना कधी ताब्यात घेण्यात आले नव्हते.

पार्क गुन हे यांच्यावरील महाभियोग

पार्क गुन हे यांना त्यांच्या नातेवाइकामार्फत लाच देण्याचे प्रकरण ली यांना भोवले आणि त्यांना अटक झाली. पार्क गुन यांचे नातेवाइक चोई सुन सिल यांनी राष्ट्रपतींशी असलेल्या जवळीकतेचा फायदा उठवत भरपूर संपत्ती जमा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सिल यांच्या व्यवहारांमुळे पार्क गुन यांच्यावर महाभियोग चालविण्यात आला आणि त्यांच्याकडून राष्ट्राध्यक्ष पदाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले. सध्या दक्षिण कोरियाचे पंतप्रधानच काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून काम पाहतात.

ली यांची तुरुंगातील खोली

ली यांना तुरुंगामध्ये इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात येणार आहे. ली यांचे सध्याचे घर हे सेऊलमधील सर्वात महाग घरांपैकी एक आहे. त्या घराची किंमत २५० कोटी रुपये आहे. त्या घरातून त्यांची रवानगी तुरुंगात झाली आहे. तुरुंगात त्यांना एक ९ बाय ८ ची खोली देण्यात आली आहे.