उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन आणि त्यांचं कुटुंबीय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दरम्यान, किम जोंग उन यांच्या बहिणीनं उत्तर कोरियामधून सोडण्यात येणाऱ्या फुग्यांवरून थेट धमकीच देऊन टाकली. उत्तर कोरियामधील काही बंडखोर दक्षिण कोरियामधून काही फुगे सोडतात. तसंच त्यात किम जोंग उन यांच्या हुकुमशाहीविरोधात काही संदेशही लिहिलेले असतात, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान किम जोंग उन यांच्या बहिणीची म्हणजेच किम यो जोंग यांचीही उन यांच्याएवढीच दहशत आहे.

किम यो जोंग यांनी उत्तर कोरियात राहत असलेल्या काही बंडखोरांना देशाचा विश्वासघात करणारे कुत्रे असं संबोधलं आहे. तसंच दक्षिण कोरियातून सोडण्यात येणाऱ्या फुग्यांवरून थेट त्यांना धमकीच दिली आहे. हे कृत्य न थांबल्यास दोन्ही देशांमधील सैन्य करार हा रद्द केला जाईल, अशी धमकी त्यांनी दिली. यानंतर दक्षिण कोरियानंही त्यांची मागणी मान्य करत याविरोधात नवा कायदा तयार करण्यात येणार असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान, असा कायदा केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव निवळेल, अशी दक्षिण कोरियाला आशा आहे.

हा सरकारवरील हल्ला

दरम्यान, दक्षिण कोरियातून असे फुगे उडवणाऱ्यांना थांबवण्यासाठी उत्तर कोरियानं अनेकदा पोलिसांद्वारे कारवाई केली होती. पण यावर बंदीची उत्तर कोरियाची मागणी मात्र फेटाळण्यात आली होती. हा प्रकार म्हणजे आपल्या सरकारवरील हल्ला आहे, असं उत्तर कोरियाचं म्हणणं आहे,

सैन्य करार तोडणार

काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाच्या अणुबॉम्ब तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षेविरोधात आणि मानवधिकाराचे उल्लंघन होत असल्याचं म्हणत त्यावर टीका करण्यात आलेले फुगे सोडण्यात आले होते. त्यानंतर किम जोंग उन यांची बहिण किम यो जोंग यांनी सैन्य करार तोडण्याची धमकी दिली होती. तसंच या बंडखोरांवर कारवाई न केल्यास दोन्ही देशांच्या उत्तम संबंधांचं प्रतीक मानली जाणारी कंपनी आणि संपर्क कार्यालयही बंद करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाले. अनेकदा दक्षिण कोरियाशीही बोलणी करण्यासाठी त्याच जात असल्याची माहिती समोर आली आहे.