दक्षिण कोरियाच्या अध्यक्षा पार्क गेन-हुई यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. दक्षिण कोरियाच्या संसदीय न्यायालयाने पार्क गेन-हुई यांच्याविरोधात निकाल दिला आहे. दक्षिण कोरियाच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारची घटना घडली आहे. पार्क यांचे अधिकार डिसेंबरमध्येच काढून घेण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात आला होता. पार्क गेन या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. मात्र आता त्यांना पदावरुन दूर करण्यात आले आहे. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांमधील सहभाग सिद्ध झाल्याने पार्क गेन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दक्षिण कोरियात आता पुढील ६० दिवसांमध्ये नवा राष्ट्राध्यक्ष निवडला जाईल. दक्षिण कोरियातील राजकीय वारे उलट्या दिशेने वाहू लागले आहेत. त्यामुळे मून जे इन यांना राष्ट्राध्यक्षपदाची संधी आहे. मिंजो पक्षाचे विरोधी पक्षनेते म्हणून २०१५ ते २०१६ या कालावधीत मून जे इन यांनी काम पाहिले आहे.

पार्क गेन-हुई यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आल्याने दक्षिण कोरियामध्ये खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा प्रभाव फक्त राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ब्लू हाऊसपर्यंतच मर्यादित नाही. या प्रकरणाचे धागेदोरे सॅमसंग कंपनीचे प्रमुख, ज्येष्ठ वकील यांच्यासह देशाच्या निवृत्ती वेतन विभागाचे प्रमुख यांच्यापर्यंत पोहोचले असल्याचे समोर आले आहे. विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लाच देण्यात आल्याचे गंभीर प्रकरणदेखील समोर आल्याने पार्क गेन-हुई यांच्याविरोधात वातावरण तापले आहे. या प्रकरणात लक्षावधी डॉलर्सचा अपहार झाल्याने संपूर्ण यंत्रणाच सामान्य माणसाच्या विरोधात असल्याची भावना दक्षिण कोरियन समाजात निर्माण झाली आहे.

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामधील संघर्ष तीव्र होत असतानाच दक्षिण कोरियामध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. उत्तर कोरियाकडून वारंवार क्षेपणास्त्रांची चाचणी केली जात असल्याने दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला आहे. उत्तर कोरिया आक्रमक झाल्याने अमेरिकेकडून दक्षिण कोरियामध्ये क्षेपणास्त्राविरोधी यंत्रणा बसवण्यात आली आहे. दक्षिण कोरियाच्या संरक्षणासाठी अमेरिकेने या भागात हस्तक्षेप केल्याने चीनने संताप व्यक्त केला आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामधील संबंध शीतयुद्धासारखे ताणले गेले असताना आता दक्षिण कोरियामधील राजकीय स्थिती नाजूक बनली आहे.