दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणातील आपलं पुढील प्रवास कसा असेल याबाबत माहिती दिली आहे. ते एक नवा पक्ष स्थापन करणार आहेत. तसंच त्यांचा पक्ष आणि सरकार हे वेगवेगळं काम पाहणार आहेत. ते स्वत: पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार असून ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यती नसतील. तसंच जो पक्षाचा नेता असेल तो कधीच सरकारचा भाग नसेल. हा पक्ष तामिळनाडून बदल घडवेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूच्या राजकारणाची माहिती घेत असल्याचं रजनीकांत यांनी सांगितलं. डीएमके आणि एआयएडीएमकेचं नाव घेत त्यांनी लोकांना बदल हवा असल्याचंही म्हटलं. “आपल्या पक्षात तरूणांना आणि उच्च शिक्षित लोकांना संधी देऊन तामिळनाडूत नवं नेतृत्व तयार करायचं आहे. म्हणूनच आपण मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही नसू,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

रजनीकांत यांच्या ड्युअल प्लॅननुसार त्यांच्या पक्षात दोन विभाग असतील. एक विभाग पक्षाचं कामकाज पाहिल, तर दुसरा सरकारमधील कामकाज पाहणार आहे. “कोणत्याही परिस्थितीत आपला पक्ष सरकारपेक्षा वरचढ होऊ देणार नाही. आमच्या पक्षात उच्च शिक्षित आणि चांगली पार्श्वभूमी असलेल्यांनाच संधी देण्यात येईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. “जी व्यक्ती पक्षाचं नेतृत्व करेल त्याला सरकारमध्ये सहभागी करून घेतलं जाणार नाही. जो मुख्यमंत्री असेल तो पक्षाचं नेतृत्व करणार नाही. मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहे आणि अन्य व्यक्ती मुख्यमंत्रीपदाची दावेदार असेल,” असं आमच्या बैठकीत ठरल्याचं रजनीकांत यांनी सांगितलं.

चुक झाल्यास कारवाई
“आमचा पक्ष स्वत: सरकारला प्रश्न विचारेल. कोणतीही चुक झाल्यास संबंधितांविरोधात पक्ष कारवाई करेल. आमच्याशी जोडल्या गेलेल्या सदस्यांचा आम्ही योग्यरित्या वापर करू. आम्ही जे काही ठरवलं आहे, ते आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. आम्ही नेते, पत्रकार आणि अधिकाऱ्यांशीही त्याबाबत चर्चा केली. परंतु त्यासाठी कोणीही तयार झालं नाही. परंतु आम्ही जे काही ठरवलंय त्यावरच आम्ही पुढे जाऊ,” असंही त्यांनी नमूद केलं आहे.