मोसमी पाऊस (मान्सून) 6 जून रोजी केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरवर्षी मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होतो. पण यावेळी तो पाच दिवस उशिराने येणार आहे.

हवामान विभागाने बुधवारी मान्सूनबाबतचा अंदाज वर्तवला आहे. यंदा देशभरात सरासरी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरवर्षी साधारणत: 1 जून रोजी मोसमी पावसाचा केरळमध्ये प्रवेश होत असतो. मात्र, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून 6 जून रोजी केरळमध्ये प्रवेश करणार आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असून अंदमान- निकोबार बेटांवर 18 ते 19 मे पर्यंत मान्सून पोहोचेल. तिथून केरळमध्ये मान्सून 10 दिवसांमध्ये पोहोचतो. मात्र, यंदा अल- निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा वेग मंदावेल आणि सहा जूनरोजी मान्सून केरळमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने मंगळवारी मान्सूनबाबतचा अंदाज वर्तवला होता. मोसमी पाऊस येत्या ४ जूनला केरळात येण्याचे चिन्हे असल्याचे स्कायमेटने म्हटले होते. मोसमी पाऊस हा दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी असणार असून दीर्घकालीन सरासरी ९३ टक्के आहे. यात पाच टक्के कमी-अधिक होऊ शकते. याचा मोसमी पाऊस ९३ टक्क्य़ांपेक्षा कमी राहील, असे स्कायमेटने म्हटले होते.