देशात यंदा नैऋत्य मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण पडेल, असा अंदाज केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री एस. जयपाल रेड्डी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला. भारतीय हवामान विभागाचा हा अधिकृत अंदाज आहे. देशात यंदा ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता या अंदाजात व्यक्त करण्यात आली आहे. अंदाज व्यक्त करण्याच्या पद्धतीनुसार यामध्ये पाच टक्क्यांची कपात किंवा वाढही होऊ शकते, असे गृहीत धरण्यात आले आहे.
दक्षिण आशियाच्या हवामानतज्ज्ञांच्या बैठकीत महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागात सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज गेल्याच आठवड्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता हवामान विभागाच्या अंदाजही सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करीत आहे. महाराष्ट्राच्या बऱयाच मोठ्या भागात यंदा दुष्काळ असल्यामुळे यंदाचा मान्सून कसा असेल, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते.
गेल्यावर्षी देशात सरासरीच्या ९३ टक्के पाऊस झाला होता. राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनुक्रमे २५ व ३३ टक्के अपुरा पाऊस पडला होता. त्याची झळ सध्या या भागाला सोसावी लागत आहे.