मृतांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश; ३२० जणांना अटक; शस्त्रास्त्रे व दारूगोळा जप्त
येथील तब्बल २६० एकर भूखंडावर अतिक्रमण करून तिथेच तळ ठोकणाऱ्या तीन हजार जणांना हुसकावून लावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर थेट हल्ला करण्याची घटना येथे गुरुवारी रात्री घडली. पोलीस आणि अतिक्रम करणारे यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत २४ जण ठार झाले. मृतांमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत ३२० जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या हिंसाचाराची दखल घेत केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारकडे घटनेचा साद्यंत अहवाल मागितला आहे.
मथुरेतील जवाहर बाग या परिसरात सरकारी मालकीची २६० एकर जमीन आहे. या जमिनीवर गेल्या दोन वर्षांपासून आझाद भारत विधिक वैचारिक क्रांती सत्याग्रही या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण उठवून भूखंड मोकळा करावा, असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी मथुरा पोलीस जवाहर बाग येथे पोहोचले. त्यांनी अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करताच संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्यावर गोळीबारच सुरू केला. त्यात मथुरेचे पोलीस अधिक्षक मुकुल द्विवेदी व पोलीस निरीक्षक संतोष यादव हे दोन्ही अधिकारी ठार झाले. या गोळीबाराला उत्तर देण्यासाठी पोलिसांची जादा कुमक घटनास्थळी येऊन पोहोचली. त्यानंतर दोन्ही बाजूने धुमश्चक्री सुरू झाली. घटनास्थळी तळ ठोकून असलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सिलिंडरना आग लावली. त्यामुळे झालेल्या स्फोटांत एका महिलेसह २२ जण ठार झाले. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला.
प्रचंड शस्त्रसाठा जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून प्रचंड प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. त्यात ४७ बंदुका, सहा रायफली, १७८ हातबॉम्ब आदींचा समावेश आहे. शुक्रवारी या प्रकरणी पोलिसांनी ३२० जणांना अटक केली. त्यात ११६ महिलांचा समावेश आहे.
काय आहे ही संघटना?
आझाद भारत विधिक वैचारिक क्रांती सत्याग्रही संघटना ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मानणारी संघटना आहे. या संघटनेतून फुटून निघालेल्या बाबा जयगुरुदेव पंथाच्या कार्यकर्त्यांनी जवाहर बाग येथे हिंसाचार केला. पंतप्रधान, राष्ट्रपती यांची निवडणूक रद्द करावी, रुपया हे चलन रद्द करून ‘आझाद हिंद सेने’चे चलन वापरावे, एक रुपयात ६० लिटर डिझेल तर ४० लिटर पेट्रोल देण्यात यावे, अशा प्रकारच्या मागण्या या संघटनेच्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 1:06 am