रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांनीही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यावर जे निकाल येतील ते सगळ्यांच्या समोर असतील पण मला खात्री आहे की देशाला एक चांगला राष्ट्रपती मिळेल, अशी प्रतिक्रिया मुलायम सिंह यांनी आज लखनऊमध्ये दिली आहे. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळची निवडणूक ही पक्षांतर्गत राजकारणापेक्षा वेगळी असेल असेही सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म हे देशाबाहेरचे धर्म आहेत, अशा आशयाचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी रामनाथ कोविंद यांनी केले होते. त्यामुळे कोविंद हे धार्मिक कट्टरता मानणारे नेते आहेत असा आरोप काँग्रेसने केला, तसेच त्यानंतर धर्मनिरपेक्ष उमेदवार मीरा कुमार यांची राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून निवड केली. सध्याच्या घडीला काँग्रेससोबत १७ पक्ष आहेत. मात्र समाजवादी पार्टी आणि जनता दल युनायटेड यांनी रालोआसोबत जात कोविंद यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. यामुळे राजद आणि जनता दल यांच्यातही वाद पेटला आहे. लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्यातून विस्तव जात नाहीये. मात्र मुलायम सिंह यांनी कोविंद यांच्या नावाला पसंती दर्शविल्याने आता लालूप्रसाद यादव यांच्यासमोर मुलायम सिंह यांचे मन वळवण्याचेही आव्हान आहे.

मुलायम सिंह यांनी रामनाथ कोविंद यांना दिलेला पाठिंबा म्हणजेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या शिष्टाईचे यश आहे अशी चर्चा रंगताना दिसते आहे. सध्याच्या योगी सरकारच्या कारभाराबाबत विचारले असता, १०० दिवसात कोणाच्याही कामाचे मूल्यांकन होऊ शकत नाही. सहा महिन्यांनंतर आम्ही या सरकारबाबत भाष्य करू असे सूचक वक्तव्य मुलायम सिंह यांनी केले आहे. तसेच २० जून रोजी मुलायम सिंह हे मुख्यमंत्री निवासस्थानी दाखल झाले होते. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची भेट झाली. तसेच मुलायम सिंह, योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दीर्घ चर्चा झाली. मुलायम सिंह यांचा कोविंद यांच्या नावाला असलेला पाठिंबा याच चर्चेचे फलित मानला जातो आहे.