उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकांना सामोरे जाण्यास पक्ष सक्षम आहे का, असा सवाल करून सपाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना जनतेपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले आहे. निवडणुकीच्या तयारीबाबत जी माहिती मिळाली त्याने मुलायमसिंह कचरले असल्याने सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा, असा आदेशच सर्वाना दिला आहे.
पंचायत निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत, ३६ आमदारांची (विधान परिषद) निवड व्हावयाची आहे आणि त्यासाठी काय पूर्वतयारी करण्यात आली त्याची आपल्याला माहितीच नाही, असे मुलायमसिंह यांनी कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात सांगितले.
याबाबत जनतेकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार सपाच्या बहुसंख्य नेत्यांना २०१७च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. अद्यापही वेळ गेलेली नाही, आपल्या वातानुकूलित दालनांमधून बाहेर पडा आणि सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा, असा आदेश त्यांनी नेत्यांना आणि मंत्र्यांना दिला.
लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जोमाने काम करा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र केवळ पाचच खासदार निवडून आले आणि आपल्याला तोंड लपविण्यास जागा राहिली नाही. पराभवाची कारणे शोधून काढा आणि त्याचा अहवाल द्या, अशा सूचनाही दिल्या होत्या, मात्र त्यावरही कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत, आत्मचिंतन केले नाही तर भविष्यकाळात आपण कसे यशस्वी होणार, असा सवालही त्यांनी केला.