सीबीआयचा न्यायालयात आरोप

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातील आरोपी आणि हवाई दलाचे माजी प्रमुख एस. पी. त्यागी यांनी गंभीर गुन्हा केला असून त्यामुळे देशाची मान शरमेने खाली गेली आहे, असा आरोप सीबीआयने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात केला. त्यागी यांना कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केलेला जामीन बेकायदेशीर असल्याचेही सीबीआयने म्हटले आहे.

सीबीआयने त्यागी यांच्या जामिनाला आव्हान दिले आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या अनेकांची त्यागी कारागृहाबाहेर यावे अशी इच्छा होती, त्यामुळे उच्च न्यायालयासमोर सुरू असलेल्या सुनावणीला विलंब व्हावा असा आरोपी प्रयत्न करीत होता ही गंभीर बाब असल्याचे सीबीआयने न्या. आय. एस. मेहता यांच्यासमोर स्पष्ट केले. त्यागी यांनी गंभीर गुन्हा केला असून त्यामुळे देशाची मान शरमेने खाली गेली आहे, त्यांना मंजूर करण्यात आलेला जामीन बेकायदेशीर आहे, कनिष्ठ न्यायालयाचा आदेश पुराव्याच्या विसंगत आहे, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयास सांगितले.