रशियन अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाल्याने तीन अंतराळवीर विलंबाने म्हणजे गुरूवारी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात पोहोचतील, असे नासाने बुधवारी जाहीर केले. रशियाचे अलेक्झांडर स्क्योरत्सोव व ओलेग आर्टेमेयेव व अमेरिकेचे स्टीव्ह स्वॅनसन असे तीन अंतराळवीर कझाकस्थानातील बकानूर अवकाशतळावरून आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकाकडे रवाना झाले.
सोयूझ बुस्टर रॉकेट स्थानिक वेळेनुसार पहाटे सव्वातीन वाजता उडाले, त्या वेळी अवकाशात चमकदार धूर दिसत होता. रात्रीच्यावेळी त्यामुळे आकाश चमकले. दहा मिनिटातच ते हव्या त्या कक्षेत गेले. सहा तासात अंतराळवीर हे अवकाशस्थानकात पोहोचतील असे सांगण्यात आले. यानातील सर्व प्रणाली व्यवस्थित काम करीत असून अवकाशवीरांना चांगले वाटत आहे.
नासाने त्यांच्या संकेतस्थळावर मात्र असे म्हटले आहे की, सोयूझचे इंजिन २४ सेकंदात प्रज्वलित व्हायला पाहिजे होते तसे झाले नाही. कक्षामार्ग व्यवस्थित रहावा यासाठी हे इंजिन प्रज्वलित केले जाते. पण ही प्रक्रिया नियोजनाप्रमाणे होऊ शकली, अवकाशवीरांना कोठलाही धोका पोहोचला नसून हे यान गुरूवारी अंतराळस्थानकाजवळ जाईल.
आताची अशी केवळ पाचवी वेळ आहे की, अवकाशवीर सहा तासात स्थानकात पोहोचलेले असतील. इंजिनाचे प्रज्वलन नीट का झाले नाही याचा शोध मॉस्कोचे उड्डाण नियंत्रक कायार्लय घेत आहे. आता जाणाऱ्या अंतराळवीरांचे स्वागत सध्या तेथे असलेले जपानचे कोईची वकाटा, नासाचे रीक मॅस्ट्रीशियो व रशियाचे मिखाईल ट्युरिन करतील. ते नोव्हेंबरपासून अवकाशस्थानकात वास्तव्यास आहेत.आताचे अवकाशवीर सहा महिने अंतराळ स्थानकात राहतील. त्यातील आर्टेमेयेव नवीन आहेत, बाकीच्यांना अवकाश प्रवासाचा अनुभव आहे.