जपानमधील कोट्याधीश आणि ऑनलाइन फॅशन क्षेत्रातील बडे नाव म्हणून ज्याला ओळखले जाते तो युसाकू माझजावा हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे २०२३ साली स्पेस एक्स या अमेरिकन कंपनीच्या पहिल्या चंद्र मोहिमेमध्ये जाणारा पहिला सामान्य व्यक्ती ठरणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर माझजावा हा चंद्रावर जाणारा पहिला अंतराळ प्रवासी ठरेल. याहून विशेष म्हणजे माझजावाबरोबर सात ते आठ जणांना चंद्रमोहिमेवर मोफत जाण्याची संधी मिळणार आहे.

या मोहिमेमध्ये आपण स्वत:बरोबर सात आठ कलाकारांनाही घेऊन जाणार असल्याचे माझजावाने सांगितले आहे. यामध्ये चित्रकार, छायाचित्रकार, संगीतकार, सिने-दिग्दर्शक, फॅशन डिझायनर, वास्तूविशारद यांचा समावेश असेल असेही त्यांने सांगितले. १९७२ च्या अपोलो मोहिमेनंतर चंद्रावर जाणारा माझजावा हा पहिला अंतराळ प्रवासी ठरेल. यासाठी माझजावाने किती किंमत मोजली आहे यासंदर्भातील कोणताही माहिती समोर आलेली नाही. कॅलिफोर्निया येथील हॉर्थोर्नमधील स्पेस एक्सच्या कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये या मोहिमेची माहिती देण्यात आली. त्यावेळी बोलताना लहानपणापासून मला चंद्र आवडतो आणि चंद्रावर जाणे हे माझे स्वप्न आहे. ते आता प्रत्यक्षात साकार होणार असल्याचे माझजावाने सांगितले.

फोर्ब्स मासिकाच्या आकडेवारीनुसार माझजावा हा जपानमधील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये अठराव्या स्थानी आहे. जपानमधील सर्वात ऑनलाइन फॅशन मॉलचा तो मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्याची एकूण संपत्ती तीन अरब डॉलरहून अधिक आहे. कलेची विशेष आवड असणाऱ्या माझजावाने या मोहिमेमध्ये त्याच्याबरोबर सात ते आठ कलाकारांना घेऊन जाण्याची तयारी केली आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, ‘या मोहिमेसाठी मी जगभरातील सहा ते आठ कलाकारांना माझ्यासोबत येण्याचं आमंत्रण देत आहे.’ या कलाकारांनी माझजावासोबत अवकाश यात्रा करुन पृथ्वीवर परत आल्यावर काही कलाकृती तयार करणे अपेक्षित आहे. या कलाकृती आपल्या मानवजातीला प्रेरणा देतील असे माझजावाचे म्हणणे आहे.

यावेळी ‘स्पेस एक्स’चा संस्थापक एलॉन मस्कने माझजावा हा सर्वात हिंम्मतवान आणि साहसी व्यक्ती असल्याचे सांगितले. अवकाशात प्रवास करण्याची इच्छा असलेल्या माझजावाने या प्रवासाची जबाबदारी आमच्यावर सोपवली आणि या कामासाठी आमची निवड केली ही आमच्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे म्हटले आहे. या मोहिमेसाठी माझजावाने किती किंमत मोजली याची माहिती मी देऊ शकत नाही. असे असले तरी कलाकारांसाठी ही अंतराळ यात्रा मोफत असेल अशीही माहिती मस्कने दिली. ‘स्पेस एक्स’ची निर्मिती असणाऱ्या ‘बिग फाल्कन रॉकेट’ने (बीएफआर) माझजावा आणि त्याच्यासोबतचे कलाकार अंतराळात जाणार आहेत.

२०१६ साली पहिल्यांदा बीएफआरची घोषणा करण्यात आली होती. अंतराळात जाणारे बिग फाल्कन हे सर्वात शक्तीशाली रॉकेट असेल असा दावा कंपनीने केला आहे. भविष्यात या रॉकेटमधून शंभर अंतराळ प्रवाशांना घेऊन जाण्याची मस्कची योजना आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर करुन भविष्यात मानव चंद्रावर आणि मंगळावर वसाहती निर्माण करुन तेथे वास्तव्य करण्याची महत्वकांशा कंपनीची आहे.

पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाण्याची किमया अत्तापर्यंत केवळ अमेरिकेला साधता आली आहे. नासामार्फत १९६० ते १९७०च्या दशकामध्ये अपोलो मोहिमेदरम्यान चंद्रावर गेले आहेत त्यापैकी केवळ १२ जण प्रत्यक्षात चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले होते.