अमेरिकेतील उद्योगपती इलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या ड्रॅगन (आता एंडेव्हर) अवकाशकुपीच्या माध्यमातून अवकाशात गेलेले नासाचे दोन अवकाशवीर रविवारी सुरक्षितपणे पृथ्वीवर आले. या मोहिमेने अवकाश प्रवासाचे खासगीकरण होण्यात महत्त्वाचे पाऊल पडले आहे. पुढील वर्षी खासगी अवकाश पर्यटन सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत.

नासाने त्यांच्या अवकाशवीरांना अवकाश स्थानकात नेण्याआणण्याचे कंत्राट आता स्पेस एक्स कंपनीला दिले आहे. बोईंग कंपनीला ही संधी देण्यात आली होती पण त्यांना तसे अवकाशवाहन तयार करण्यात तातडीने यश मिळवता आले नाही. ही अवकाशकुपी दोन महिन्यांपूर्वी फ्लोरिडातून सोडण्यात आली होती व ती अवकाशस्थानकाजवळ गेल्यानंतर तेथेच होती. नंतर या अवकाशवीरांचे वास्तव्य पूर्ण झाल्यानंतर त्याच कुपीत बसून ते परत आले. याचा अर्थ यात खूप मोठय़ा प्रमाणावर पैशांची बचतही झाली आहे.

यापूर्वी नासाचे अवकाशवीर अशाच पद्धतीने २४ जुलै १९७५ रोजी पॅसिफिकमध्ये अवकाशकुपीतून परतले होते.   ही अवकाशकुपी वेग कमी करत पृथ्वीच्या वातावरणात येते व नंतर अलगदपणे समुद्रात पाडली जाते. आताच्या मोहिमेत डग हर्ले व बॉब बेन्केन हे स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूलच्या मदतीने परत आले असून शनिवारी ते अवकाशस्थानकातून परतीच्या प्रवासाला निघाले होते. त्यानंतर त्यांची ही अवकाश कुपी मेक्सिकोच्या आखातातील पेन्साकोला येथे उतरली, वादळग्रस्त फ्लोरिडापासून हे ठिकाण जवळच आहे. एका विशिष्ट उंचीवर आल्यानंतर अवकाशकुपीचे पॅराशूट खुले करण्यात आले त्यामुळे अवतरण सुरक्षित झाले. स्पेस एक्स कंपनीने अवकाशवीरांना आणण्यासाठी परिचारिका व डॉक्टरांचा समावेश असलेले खास जहाज तयार ठेवले होते. स्पेसएक्सच्या मुख्यालयातून अवकाशवीरांचे स्वागत करण्यात आले. गेल्या काही महिन्यात ज्या घटना झाल्या त्या भारावून टाकणाऱ्या होत्या, असे अवकाशवीर हर्ले यांनी सांगितले. स्पेस एक्सचे प्रमुख मस्क हे कॅलिफोर्नियातील हॉथोर्न येथील मुख्यालयातून ह्यूस्टनला अवकाशवीरांच्या स्वागतासाठी गेले होते. त्यांनी सांगितले की, मी धार्मिक प्रवृत्तीचा नाही पण मी यशासाठी प्रार्थना केली होती. अवकाशवीरांचे पृथ्वीवरचे पुनरागमन हे अवघड असते कारण त्यात अनेक धोके असतात.

अवकाशकुपी उतरल्यानंतर..

अवकाशकुपीच्या अवतरणाचा श्वास रोखायला लावणारा कार्यक्रम काही मिनिटात संपला. त्यानंतर १५ फुटांची कुपी स्पेस एक्सच्या जहाजावर दिमाखात तरंगत होती. नंतर अवकाशवीरांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. त्यांना करोनाचा धोका होऊ नये यासाठी आधी त्यांची वैद्यकीय तपासणी करून हेलिकॉप्टरने पेन्साकोला व नंतर ह्य़ूस्टनला नेण्यात आले. अध्यक्ष ट्रम्प व उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी परत आलेल्या दोन्ही अवकाशवीरांचे स्वागत केले आहे. दोन महिन्यांनंतर अवकाशवीर सुखरूप परतले हे मोठे यश आहे व हा आनंदाचा क्षण आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

मोहिमेचे वैशिष्टय़

नासाच्या नेतृत्वाखाली खासगी कंपनीने पहिल्यांदाच समानव अवकाश मोहीम यशस्वी केली असून त्यातून खासगी अवकाश पर्यटनाचा मार्ग खुला झाला. यामुळे अमेरिकेची स्पेस शटल बंद झाल्यानंतरचे रशियावरचे अवलंबित्व संपले. आता त्यासाठी रशियाला लाखो डॉलर्स द्यावे लागणार नाहीत.