स्पेनमध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणातील न्यायालयाच्या निकालानंतर महिला संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्याखाली दोषी न ठरवता त्यांना फक्त लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले. बलात्कारानंतरच्या एका व्हिडिओत पीडिता स्तब्ध उभी होती आणि तिचे डोळे बंद होते हे दिसते. यावरुन तिची या शरीरसंबंधांना संमती होती, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. कोर्टानेही बचावपक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत सर्व आरोपींना सामूहिक बलात्काराऐवजी फक्त लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात दोषी ठरवले. या आरोपींना आता १४ ऐवजी ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात जाण्याची चिन्हे आहेत.

न्यायदेवता आंधळी असते म्हणजे काय याचा प्रत्यय सध्या स्पेनची जनता घेत आहे. सामुहिक बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊनही केवळ कायद्याच्या पुस्तकांमध्ये लिहिल्याप्रमाणे गुन्हा घडला नाही केवळ या कारणासाठी सामूहिक बलात्कारातील गुन्हेगारांची शिक्षा तब्बल पाच वर्षांनी घटण्याचा प्रकार स्पेनमध्ये घडला आहे. स्पेनमधील कायद्यानुसार हिंसा, धमकी, बळजबरीचा वापर केल्यावरच तो बलात्कार किंवा सामूहिक बलात्काराचा गुन्हा ठरतो. या कलमाअंतर्गत स्पेनमध्ये १४ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. आता या कायद्यात सुधारणा करण्याची वेळ आली आहे, असे महिला संघटनांचे म्हणणे आहे.
स्पेनमध्ये एप्रिल २०१६ मध्ये १८ वर्षांच्या तरुणीवर ‘ला मानाडा’ (लांडग्यांचा कळप) या व्हॉट्स अॅप ग्रुपमधील पाच सदस्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप होता. सॅन फर्मिन बुल रनिंगदरम्यान हा प्रकार घडला होता. अर्ध्या तासांत या नराधमांनी नऊ वेळा तिच्यावर बलात्कार केला. हा व्हॉट्स अॅप ग्रुप महिलांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यासाठी ओळखला जातो. अत्याचारानंतर ग्रुपचे सदस्य ग्रुपवर व्हिडिओ पोस्ट करतात. बलात्कारानंतर पाचही नराधमांनी तिथून पळ काढला. त्यांनी पीडित तरुणीकडील मोबाईल फोनही चोरला होता.

या घटनेने स्पेनमध्ये खळबळ उडाली होती. आरोपींना सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषी ठरवून त्यांना २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी तुरुंगवासाची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. तर बचावपक्षाच्या वकिलांनी तरुणीच्या संमतीनेच हे संबंध ठेवण्यात आले होते, असा दावा केला. बचाव पक्षाच्या वतीने कोर्टात व्हिडिओ देखील सादर करण्यात आले. या व्हिडिओत बलात्कारानंतर पीडित मुलगी डोळे बंद करुन शांतपणे उभी होती. तसेच तिने पाच पैकी एका आरोपीला चुंबन घेऊ दिले होते, असा दावाही बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. तर पीडित तरुणी ही घाबरली होती आणि या मानसिक धक्क्यामुळे ती स्तब्ध उभी होती, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर नवारा येथील न्यायाधीशांनी निर्णय दिला आहे. न्यायालयाने आरोपींना लैंगिक अत्याचाराप्रकरणी आरोपींना दोषी ठरवले. पीडितेने पाचही नराधमांना शरीरसंबंधांसाठी सहमती दर्शवली नव्हती. आरोपींनी परिस्थितीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. मात्र, आरोपींना बलात्काराअंतर्गत दोषी ठरवता येणार नाही, असे सांगत न्यायालयाने सर्वांना नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पीडितेने प्रतिकार न केल्याने हिंसा झाली नाही आणि त्यामुळे हा गुन्हा सामूहिक बलात्काराच्या व्याख्येत बसत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने तीन विरुद्ध दोन अशा मताने हा निर्णय दिला. दोन न्यायाधीशांनी आरोपींना बलात्काराच्या कलमाअंतर्गत दोषी ठरवले. पीडितेने प्रतिकार न केल्याने हिंसा झाली नाही आणि त्यामुळे हा गुन्हा सामूहिक बलात्काराच्या व्याख्येत बसत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.