पोलीसप्रमुख जोसेप त्रापेरो यांची हकालपट्टी

स्वत:ला स्पेनपासून वेगळे करणाऱ्या कॅटलोनियावर थेट नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत स्पेनने शनिवारी तेथील पोलीसप्रमुखांची हकालपट्टी केली.

कॅटलान प्रांतिक पार्लमेंटने शुक्रवारी स्पेनपासून वेगळे होत कॅटलोनियाचे स्वतंत्र राष्ट्र स्थापन झाल्याचा ठराव केला होता. यानंतर कॅटलोनियाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व मंत्री यांच्यासह संपूर्ण पार्लमेंट स्पेनच्या अध्यक्षांनी बरखास्त केली होती. शनिवारी त्यांनी मोसोज डीएसक्वाड्रा विभागीय पोलिसांचे प्रमुख जोसेप लुइस त्रापेरो यांना बडतर्फ केल्याची घोषणा केली.

फुटीरतावादी नेत्यांचे साथीदार असल्याचे मानले जाणाऱ्या त्रापेरो यांच्या बडतर्फीची घोषणा सरकारच्या अधिकृत गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. कॅटलोनियात १ ऑक्टोबरला सार्वमत घेण्यास बंदी घालण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा त्रापेरो यांनी भंग केल्याचा स्पेनचा आरोप आहे. त्याऐवजी, स्पेनचे राष्ट्रीय पोलीस आणि नागरी निमलष्करी दलांनी या मतदानात अडथळे आणले होते.

कायदेशीर अधिकारच नाहीत

दरम्यान, कॅटलोनियन पार्लमेंटने स्वतंत्र राष्ट्राचा ठराव मंजूर केला असला, तरी त्याची अंमलबजावणी करण्याचे कायदेशीर अधिकार या प्रांताला नसल्याचे विश्लेषकांचे मत आहे. तरीही, शुक्रवारच्या या निर्णयाबाबत बार्सिलोनासह इतर कॅटलान शहरांमध्ये हजारो लोकांनी जल्लोष साजरा केला. तसेच स्पेनच्या समर्थकांनी झेंडे दाखवून विरोधही केला.

२१ डिसेंबरला निवडणुका?

कॅटलान स्वतंत्र प्रजासत्ताक जाहीर करणे हा ‘अवज्ञेचा कळस’ असल्याचे सांगून, स्पेनचे पंतप्रधान मारिआनो राहॉय यांनी सिनेटने दिलेल्या अधिकारांचा वापर करून २१ डिसेंबरला निवडणुका घेण्याचे जाहीर केले. आता कार्ल्स पुगमेमाँट यांच्या नेतृत्वातील  फुटीर मंत्रिमंडळ माद्रिदने पाठवलेल्या काळजीवाहू दूतांसाठी पायउतार होते काय, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.