करोना व्हायरसच्या संकटापुढे स्पेन पूर्णपणे हतबल असून तिथे दररोज मृतांचा आकडा वाढत आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत करोना व्हायरसमुळे १४ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाउनमुळे स्पेनमध्ये एकाबाजूला कंपन्या, कारखाने बंद आहेत तेच दुसऱ्याबाजूला शवपेट्या बनवणाऱ्या एका कंपनीमध्ये दिवसरात्र काम सुरु आहे. रॉटयर्सने हे वृत्त दिले आहे.

मृतांची संख्या वाढत असल्यामुळे शवपेट्यांची मागणी देखील मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शवपेट्या बनवणाऱ्या या कंपनीने अनेक नव्या कामगारांची भरती केली आहे. सध्या शवपेट्यांची मागणी आठपटीने वाढली आहे असे ११० वर्ष जुन्या कंपनीचे सीईओ मारीया चाओ यांनी सांगितले.

स्पेनमधील ही सर्वात मोठी कंपनी असून ते लाकडापासून शवपेट्या बनवतात. माद्रिदमधील मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही दररोज ३०० शवपेट्या बनवून पाठवत आहोत असे मारीया चाओ यांनी सांगितले. उत्पादन वाढण्यासाठी Ataudes Chao या कंपनीने मागच्या दहा दिवसात सहा नवीन कायमस्वरुपी कामागारांची भरती केली आहे.