आंतरराष्ट्रीय प्रकाशवर्षांच्या पहिल्याच महिन्यात वैज्ञानिकांनी प्रकाशाचा वेग हवेच्या माध्यमातून जाताना कमी करण्याचा प्रयोग जगात प्रथमच यशस्वी केला आहे. प्रकाश हवेतून प्रवास करीत असताना हा वेग कुठल्याही इतर पदार्थामुळे कमी होत नाही. वैज्ञानिकांना हे बऱ्याच काळापासून माहिती आहे की, पाणी व काचेतून जाताना प्रकाशाचा वेग काहीसा कमी होतो, पण अवकाशातून जाताना प्रकाशकण म्हणजे फोटॉनचा वेग कमी होत नाही.
‘स्पॅटिअली स्ट्रक्चर्ड फोटॉन्स दॅट ट्रॅव्हल इन फ्री स्पेस स्लोअर दॅन स्पीड ऑफ लाइट’ हा शोधनिबंध सायन्स एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. ग्लासगो विद्यापीठ व हेरियट वॉट विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, आम्ही प्रकाशकणांचा वेग मुक्त अवकाशात प्रथमच कमी केला असून ही मोठी कामगिरी आहे.
प्रकाशाचा वेग हा केवळ स्थितीत सेकंदाला १,८६,००० मैल असून आता प्रकाशाचा वेग बदलण्यात यश आल्याने प्रकाशविज्ञानात अनेक बदल होणार आहेत. विशेष मास्कमधून फोटॉन म्हणजे प्रकाशकण सोडण्यात आले व त्यामुळे फोटॉन्सचा म्हणजे प्रकाशकणांचा आकार बदलला व त्यामुळे प्रकाशाचा वेग कमी झाला. टाइम ट्रायल रेस असे या प्रयोगाचे वर्णन करण्यात आले असून दोन प्रकाशकण एकाच अंतराच्या दिशेने एकाच अंतिम रेषेपर्यंत सोडण्यात आले.
संशोधकांच्या मते एक प्रकाशकण (फोटॉन) अपेक्षेप्रमाणेच अंतिम रेषेपर्यंत गेला पण विशिष्ट रचना असलेला प्रकाशकण (फोटॉन) हा नंतर पोहोचला. या प्रकाशकणाचा आकार बदलण्यात आला होता. १ मीटर अंतराकरता प्रकाशाची तरंगलांबी २०पर्यंत कमी करण्यात यश आले. काच किंवा पाण्यातून प्रकाशकण सोडण्यापेक्षा हा वेगळा प्रयोग होता या दोन्ही घटकातून प्रवास करताना प्रकाशाचा वेग कमी होतो पण तो त्या माध्यमातून बाहेर पडल्यावर पूर्ववत होतो. ग्लासगो विद्यापीठाच्या ऑप्टिक्स ग्रुपचे प्रा. माइल्स पॅडगेट यांनी हा प्रयोग काही वैज्ञानिकांच्या मदतीने यशस्वी केला.
 पॅडगेट यांनी सांगितले की, यामुळे प्रकाशाचे गुणधर्म समजण्यास नव्याने मदत होणार आहे. त्याचे उपयोग काय करता येतील याचाही पाठपुरावा केला जाईल.