अमेरिकेत श्रीनिवास कुचिभोतला या भारतीय तरुणाची हत्या झाल्यानंतर आता भारतीय तरुणांना सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तेलंगणा अमेरिकन तेलगू असोसिएशनने (टाटा) अमेरिकेतील तेलगू भाषिक तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी तेलगू भाषेत संवाद साधणे टाळावे असे निर्देश जारी केले आहेत.

चार दिवसांपूर्वी अमेरिकेतील कन्सासमध्ये श्रीनिवास कुचिभोतला आणि अशोक मदासनी या दोन भारतीय तरुणांवर नौदलातील माजी अधिका-याने गोळीबार केला होता. यात श्रीनिवासचा मृत्यू झाला होता. तर अशोक मदासनी हा गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर आता अमेरिकेतील भारतीयांनी सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेतील तेलंगणा तेलगू असोसिएशनने तेलगू भाषिकांना निर्देश दिले आहेत. अमेरिकेत राहणा-या तेलगू भाषिकांनी सार्वजनिक ठिकाणी तेलगू भाषेत संवाद साधणे टाळावे. याऐवजी इंग्रजी भाषेत संवाद साधावा असे संघटनेने म्हटले आहे. तसेच कोणीशीही वाद घालू नये. कोणासोबत वाद झाल्यास काही न बोलता तातडीने तिथून निघून जावे असे संघटनेच्या फेसबुक पेजवर म्हटले आहे. निर्जनस्थळी हल्ला होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा ठिकाणी जाणे टाळावे तसेच एकट्याने फिरणेही टाळावे असे आवाहन संघटनेने केले आहे.

दरम्यान, श्रीनिवास कुचिभोतला या तरुणाचे पार्थिव मंगळवारी भारतात दाखल झाले. शोकाकूल वातावरणात श्रीनिवासला अंतिम निरोप देण्यात आला. वर्णव्देषातून झालेल्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्याने कुचिभोतला कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अमेरिकेमध्ये अन्य देशांमधून येणा-यांचे प्रमाण जास्त आहे. या लोकांनी अमेरिकेत येऊ नये हे सांगणारे तुम्ही कोण आहात असा सवाल उपस्थित करत श्रीनिवासच्या आईने ट्रम्प यांच्या धोरणावर टीका केली.