संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बुधवारी गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये तृणमुल काँग्रेसच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे दुपारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. भाजपच्या काही खासदारांनी राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप करीत, तृणमुलच्या सदस्यांनी सभागृहात अक्षरश: गोंधळ घातला. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांना शांत राहण्याचे आवाहन केले. गोंधळ न थांबविल्यास कडक कारवाई करण्याचा इशारासुद्धा त्यांनी दिला. तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना लक्ष्य केले. ‘तुम्ही लोकसभेच्या अध्यक्षा आहात, नरेंद्र मोदींच्या नाही’, असे सुमित्रा महाजन यांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर राज्‍यसभेचे कामकाजही दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले. या सगळ्या गोंधळात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर केला.