तेलंगण राज्याच्या निर्मितीसंदर्भातील मुद्दय़ांबाबत तयार करण्यात आलेल्या विशेष मंत्रिगटाच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक येत्या ३ डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. आंध्र प्रदेशचे विभाजन आणि तेलंगणा विधेयकाचा मसुदा तसेच नव्या राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया आदी मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.
मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ तेलंगण राज्याविषयीची चर्चाच केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. नव्या राज्याच्या निर्मितीसाठी कोणकोणते पर्याय व्यावहारिकदृष्टय़ा शक्य आहेत, त्याची चाचपणी केली जाईल आणि मग सर्वात चांगला पर्याय कोणता यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
हैद्राबाद शहर कोणत्या राज्यात जाणार हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. विभाजन झाल्यास, सीमांध्र भागातील नेते आपल्या जीविताची तसेच स्थावर-जंगम मालमत्तेची हमी सातत्याने सरकारकडे मागत आहेत, त्यामुळे या बाबीवरही बैठकीत खल होणार असल्याचे संकेत शिंदे यांनी दिले.