News Flash

सुनावणीवेळी हात जोडून उभे होते राम रहिम

समर्थकांनी काही वृत्त वाहिन्यांच्या ओबी व्हॅनही पेटवून दिल्या.

Baba Ram Rahim: डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. शुक्रवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला.

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहिम यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. शुक्रवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. आश्रमातील एका साध्वीवर बलात्कार केल्याचा राम रहिम यांच्यावर आरोप होता. बलात्काराबरोबर जिवे मारण्याचीही धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता २८ ऑगस्ट रोजी त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीशांनी निकाल देण्यासाठी १० मिनिटांचा वेळ घेतला. निर्णय देत असताना राम रहिम हात जोडून न्यायालयात उभे होते. दरम्यान, राम रहिम यांचे समर्थक हिंसक बनले असून अनेक ठिकाणी जाळपोळीचे प्रकार घडले आहेत. काही वृत्त वाहिन्यांच्या ओबी व्हॅनही पेटवण्यात आले आहेत.

निर्णय सुनावण्यापूर्वी राम रहिम यांच्या सुरक्षा रक्षकांना न्यायालयाबाहेर रोखण्यात आले. न्यायालयात फक्त न्यायाधीश, वकील, दोन पोलीस अधिकारी आणि आरोपी उपस्थित होते. निर्णय देताना पोलिसांनाही बाहेर काढण्यात आले होते. त्याचबरोबर न्यायालयात उपस्थित असलेल्यांचे फोनही बंद करण्यात आले होते. निकाल दिल्यानंतर राम रहिम यांना कोठडीत नेण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

राम रहिम यांच्यावर एका साध्वीने बलात्काराचा आरोप केला होता. याचप्रकरणी वर्ष २००२ मध्ये एका साध्वीने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना निनावी पत्र पाठवले होते. त्याची एक प्रत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीशांनाही पाठवले होते. वाजपेयी यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.

दरम्यान, न्यायालयात पोहोचण्यापूर्वी राम रहिम यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून समर्थकांना घरी परत जाण्याचे आवाहन केले होते. समर्थकांनी घरी जाऊन कायद्याचे पालन करावे, असे अपील त्यांनी केले होते. परंतु, समर्थक त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अनेक महिलाही आपल्या मुलांसह पंचकुला येथे आले आहेत. माध्यमांनीही समर्थकांना परत जाण्याची विनंती केल्यानंतर काही समर्थकांनी आपण काही चुकीचे करत नसल्याचे म्हटले. याचदरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटना घडत असून दगडफेक, जाळपोळीचे प्रकार सुरू आहेत. काही वृत्त वाहिन्यांच्या ओबी व्हॅनही पेटवून देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 5:19 pm

Web Title: special cbi court verdict on baba ram rahim in sadhvi sexual harassment rape case
Next Stories
1 वैयक्तिक गोपनीयतेच्या निकालामुळे महाराष्ट्रातील गोमांसबंदी रद्द होणार?
2 प्रियांका गांधींना ‘डेंग्यू’चे निदान; दिल्ली रूग्णालयात उपचार सुरु
3 बाबा राम रहिम बलात्कार प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Just Now!
X