Aircel-Maxis प्रकरणात देशाचे माजी अर्थमंत्री, काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर ३ सप्टेंबरपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे. तसेच तोपर्यंत त्यांच्या अंतरिम संरक्षणातही वाढ करण्यात आली आहे.

Aircel-Maxis डील प्रकरण हे 2G स्पेक्ट्रम खटल्यांमधून प्रकाशझोतात आलेले प्रकरण आहे. यामध्ये चिदंबरम यांच्यावर एअरसेल या टेलिकम्युनिकेश कंपनीत गुंतवणूकीसाठी मेसर्स ग्लोबल कम्युनिकेशन होल्डिंग सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला एफआयपीबी क्लियरन्स मंजूर करण्यासंबंधी घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहे.

याप्रकरणी केंद्रीय तपास खात्याने (सीबीआय) १८ आरोपींविरोधात दिल्ली हायकोर्टात १९ जुलै २०१८ रोजी ताजी चार्जशीट दाखल केली होती. यामध्ये पी. चिदंबरम, कार्ती चिदंबरम आणि काही सरकारी सेवेत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

दरम्यान, सध्या INX Media प्रकरणात आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चिदंबरम यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाने नुकतेच चिदंबरम यांना सोमवारपर्यंत ईडीच्या अटकेपासून संरक्षण दिले आहे. या प्रकरणात त्यांना सोमवारपर्यंत सीबीआयच्या कोठडीत रहावे लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने याच दिवसापर्यंत अर्थात २६ ऑगस्टपर्यंत याप्रकरणाची तपासणी पुढे ढकलली आहे.