येथील विधी शाखेची पदव्युत्तर विद्यार्थिनी असलेल्या पीडित मुलीने ४३ चित्रफिती असलेला पेनड्राइव्ह विशेष चौकशी पथकाला दिला असून त्यात भाजप नेते चिन्मयानंद यांच्यावरील आरोपांना पुष्टी देणारी माहिती आहे. चिन्मयानंद यांनी आपल्यावर बलात्कार करून वर्षभर शारीरिक छळ केला असा आरोप या पीडितेने केला आहे.

विशेष चौकशी पथकाने या मुलीस तिच्याकडे असलेले सर्व पुरावे सादर करण्यास सांगितले होते. शुक्रवारी या पथकाने तिचे जाबजबाब घेऊन चिन्मयानंद यांच्या शयनकक्षातून पुरावे गोळा केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात आले आहे.

या मुलीला शुक्रवारी सकाळी चिन्मयानंद यांच्या घरी आणण्यात आले, तेथे चिन्मयानंद यांचे गुरूवारी सात तास  जाबजबाब घेण्यात आले होते. त्यांचे दिव्यधाम येथील शयनगृह सील करण्यात आले आहे.

या मुलीने असा आरोप केला की, शयनकक्षातील अनेक गोष्टीत फेरफार  करण्यात आला असून  तेथील रंग बदलण्यात आला आहे. काही वस्तू काढून टाकण्यात आल्या आहेत.

तेलाची दोन भांडी मसाजसाठी वापरली जात होती, तेथे  एक टॉवेल व टूथ पेस्ट तसेच साबण होता; या वस्तू विशेष चौकशी पथकाने ताब्यात घेतल्या असून न्याय वैद्यक तज्ज्ञांच्या ताब्यात देण्यात आल्या.

पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार बीए एलएलबीच्या आणखी एका विद्यार्थिनीचा असाच छळ करण्यात आला असून तिनेही पाच सप्टेंबरला दिल्ली पोलिसांना माहिती दिली आहे.

‘मसाज करणे गुन्हा नाही’

या मुलीने तिच्यावर आलेल्या प्रसंगाची माहिती देताना सांगितले, की तिने एलएलएमसाठी प्रवेश घेतल्यानंतर चिन्मयानंद यांच्या लोकांनी तिला त्यांच्या घरी बोलावून घेतले व वरच्या मजल्यावर ते जिथे राहत होते तिथे नेले, तिथे तिला तिचीच स्नान करीत असतानाची चित्रफीत दाखवण्यात आली. नंतर चिन्मयानंद यांनी तिचे शारीरिक शोषण सुरू केले. ही चित्रफीत तपास पथकाला सापडलेली नसून ती चिन्मयानंद यांच्या हरिद्वार येथील आश्रमात ठेवली असल्याची शक्यता आहे. चिन्मयानंद यांचे वकील ओम सिंह यांनी, मसाज करणे हा गुन्हा नाही, लोक त्यासाठी स्पामध्ये जातात. त्या चित्रफितीत काहीही दबावाखाली केल्याचे चित्रण नाही, असे म्हटले आहे.