अरुणाचल प्रदेशमध्ये जदयूचे सात पैकी सहा आमदार भाजपामध्ये गेल्यामुळे, काहीशी नाराज झालेल्या जदयूला विरोधी पक्ष असलेल्या राजदकडून एक खास ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर थेट मुख्यमंत्री नितीश कुमार यांना देण्यात आली आहे. राजदचे नेते आणि माजी बिहार विधानसभा स्पीकर उदय नारायण चौधरी यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जर नितीश कुमार भाजपाप्रणीत एनडीए सोडत असतील आणि तेजस्वी यादव यांना बिहारचा मुख्यमंत्री बनवत असतील, तर विरोधी पक्ष त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करेल.

सध्या भाजपा व जदयूमध्ये काहीसे तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राजदकडून ही ऑफर देण्यात आल्याचे दिसत आहे. राजदचे म्हणणे आहे की, भाजपाकडून नितीश कुमार यांच्यावर अधिकार गाजवला जात आहे व त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे दबाव देखील आणला जात आहे.

विशेष म्हणजे नुकताच नितीश कुमार यांनी स्वतः  “यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती. मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे मी दबावामध्ये हे पद स्वीकारल्याचा दावा केलेला आहे.…”

नितीश कुमार म्हणतात, “मी दबावाखाली मुख्यमंत्री पद स्वीकारलं; कोणालाही मुख्यमंत्री बनवा मला…”

अरुणाचल प्रदेशमध्ये जदयू आमदारांच्या भाजपा प्रवेशानंतर जदयूचे वरिष्ठ नेते केसी त्यागी यांनी पत्रकारपरिषदेत उघडपणे याबाबत नाराजी बोलून दाखवली होती. आघाडीच्या राजकारणासाठी हे चांगले संकेत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

आघाडीच्या राजकारणासाठी हे चागले संकेत नाही; जदयूचा भाजपाला इशारा!

याचबरोबर भाजपाकडून महत्वाचा मुद्दा बनवण्यात आलेला, लव्ह जिहाद विरोधी कायद्या बिहारमध्ये लागू करण्यास जदयूकडून फारशी अनुकुलता दर्शवली गेलेली नाही. जदयूचे सरचिटणीस केसी त्यागी यांनी लव्ह जिहाद बाबत भूमिका स्पष्ट केली आहे. लव्ह जिहादच्या नावाखील देशात द्वेष व फूट पाडण्याचे वातावरण निर्माण होत आहे. घटना आणि सीआरपीसीच्या तरतुदींमुळे दोन प्रौढांना एखाद्याच्या धर्माचा किंवा जातीचा विचार न करता त्यांच्या आवडीचा जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते. असं त्यागी म्हणाले आहेत.

एकीकडे जदयूकडून नाराजी व्यक्त केली जात असताना, दुसरीकडे भाजपाकडून मात्र बिहारमधील भाजपा- जदयू आघाडी अभेद्य राहणार असून, पाच वर्ष नितीश कुमार यांच्या नेतृत्वात सरकार कामकाज करेल. असे सांगितले जात आहे.