News Flash

शेतकऱ्यांची ट्रेन मार्ग चुकली! नियोजित मार्गापासून १६० किमी भरकटली

या ट्रेनमध्ये महाराष्ट्रातील अडीच हजार शेतकरी प्रवासी

भारतीय रेल्वे (संग्रहित फोटो)

भारतीय रेल्वे आणि गोंधळ हे जणू समिकरणच झाले आहे. रेल्वे इंजिन स्वत:च्या स्वत: धावणे, मजेदार सूचनांचे प्रकरण ताजे असतानाच यामध्ये गंतव्य स्थान चुकण्याच्या प्रकरणाचाही समावेश झाला आहे. दिल्लीतील ‘शेतकरी मोर्चा’नंतर कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीहून निघालेली ‘स्वाभिमान एक्सप्रेस’ ही विशेष ट्रेन चक्क मध्यप्रदेशमध्ये पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे अडीच हजार शेतकरी प्रवास करत असलेल्या या ट्रेनचा १६० किलोमीटरचा चूकीचा प्रवास झाल्यानंतर ही बाब लक्षात आली.

नियोजित मार्गाऐवजी वेगळीकडेच ट्रेन सुखरुप पोहचली हेही विशेष, कारण अशाप्रकरणांमध्ये अपघात होण्याची शक्यता जास्त असते.
दिल्लीहून शेतकऱ्यांना घेऊन निघालेली ‘स्वाभिमान एक्सप्रेस’ आज सकाळी कोल्हापूरला येणे अपेक्षित होते. उत्तर प्रदेशमधील मथुरावरून गुजरातमधील कोटा, सूरतवरून महाराष्ट्रातील मुंबई-पुणे मार्गे कोल्हापूरला पोहचणे अपेक्षित होते. मात्र चुकीचे सिग्नल मिळाल्याने गाडी मथुरावरून आग्रा, ग्वालियरमार्गे मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील बानमोर स्थानकात पोहचली.

बानमोर स्थानकात गाडी थांबल्यानंतर प्रवासी शेतकऱ्यांना गाडी चुकीच्या मार्गावर असल्याचे जाणवले. त्यांनी याबद्दलची माहिती ट्रेनचा मोटरमन आणि स्टेशन मास्तरांनी दिली. मथुरावरून कोटा, सूरत, मुंबई पुणेमार्गे आम्ही कोल्हापूरात पोहचणे अपेक्षित होते. मात्र मथुरा स्थानकातील स्टेशन मास्तरने आग्रा मार्गावर या ट्रेनला सिग्नल दिला. आणि सिग्नलच्या निर्देशांनुसार ट्रेन मूळ मार्गापासून १६० किलोमीटर भरकटत बानमोर स्थानकात पोहचल्याची माहिती एका वृत्तवाहिनीला प्रवाशांनी दिली. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रवाशी शेतकऱ्यांनी बानमोर स्थानकात मालगाडी अडवून धरत गाडी परत पाठवण्याची मागणी केली. आता ही गाडी पुन्हा मथुरेला येण्यासाठी सात ते आठ तास लागणार असून तेथून पुढे ही गाडी राजस्थानमधील कोटामार्गे महाराष्ट्राकडे रवाना होईल अशी माहिती समोर येत आहे.

हे प्रकरण म्हणजे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे, अशी टीका शेतकरी स्वाभिमान संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या वक्तव्यामध्ये केली. १८ तारखेला दिल्लीच्या दिशेने शेतकरी मोर्चेकऱ्यांना घेऊन ही ट्रेन गेली होती. मोर्चानंतर काल रात्री म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता ही ट्रेन दिल्लीहून रवाना झाली. आज सकाळी ही ट्रेन महाराष्ट्रात येणे अपेक्षित होते मात्र या घोडचूकीनंतर ही ट्रेन उद्या सकाळी कोल्हापूरमध्ये दाखल होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 12:25 pm

Web Title: special train for farmers swabhiman express takes wrong route for 160 kms reach madhya pradeshs banmore instead of maharashtras kolhapur
Next Stories
1 मोदींचे हात तोडणारे अनेकजण आहेत, राबडीदेवींचा पलटवार
2 हाफिज सईदला नजरकैदेतून मुक्त केल्यास पाकिस्तानच्या अडचणी वाढणार
3 केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि भाजप नेते ‘जैश’च्या रडारवर : गुप्तचर यंत्रणा
Just Now!
X