करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि कॉलेजेस बंद असली तरी झालेल्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचा समावेश होता. मात्र हरियाणा बोर्डाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालानंतर एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथील सुप्रिया नावाच्या एका दिव्यांग विद्यार्थनीला दहावीच्या निकालात गणित विषयात केवळ दोन गुण मिळाले. मात्र तिने पेपर रिचेकिंगला टाकल्यानंतर तिचे गुण थेट ९८ ने वाढले आणि तिला पैकीच्या पैकी गुण मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार सुप्रिया नावाच्या विद्यार्थीनीला हरियाणा बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनने घेतलेल्या १० वीच्या परिक्षेमध्ये गणित विषयात केवळ दोन गुण मिळाले. १० जून रोजी हरियाणा बोर्डाचा दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. सुप्रिया ही अंध असल्याने तिने दिव्यांग विद्यार्थीनी म्हणून परीक्षा दिली होती. मात्र दिव्यांग विद्यार्थ्यांचे पेपर तपासणीप्रमाणे तिचे पेपर तपासले गेले नाहीत. त्यामुळेच तिने रिचेकिंगसाठी अर्ज केला. रिचेकिंगमध्ये गणित विषयाचे तिचे गुण थेट २ वरुन १०० झाले.

“मला गणितामध्ये दोन गुण असल्याचे निकालामध्ये दाखवण्यात आलं होतं. ते पाहून मला धक्काच बसला, मी दु:खी झाले होते. माझ्या वडिलांनी पेपर रिचेकिंगला टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनीच सर्व अर्जवगैरे भरला. त्यानंतर मला १०० गुण असल्याचा निकाल आला. कोणत्याही दिव्यांग विद्यार्थ्याबरोबर असं होऊ नये यासंदर्भात बोर्डाने काळजी घेतली पाहिजे अशी माझी मागणी आहे,” असं सुप्रियाने एएनआयशी बोलताना सांगितलं. सुप्रिया ही अंशत: अंध आहे. सुप्रियाच्या वडिलांनी तिला सर्व विषयांमध्ये ९० च्या वर गुण होते आणि केवळ गणितामध्ये दोन गुण होते. त्यामुळेच आम्ही पेपर रिचेकिंगला टाकण्याचा निर्णय घेतला अशी माहिती दिली.

“मी स्वत: गणित विषयाचा शिक्षक आहे. माझ्या मुलीला सर्व विषयामध्ये चांगले गुण मिळाले मात्र गणितामध्ये केवळ दोन गुण मिळाल्याने आम्हाला आश्चर्य वाटलं. मी पेपर रिचेकिंगला देण्याचा निर्णय घेतला. अर्ज करणे आणि इतर खर्च पकडून यासाठी मला पाच हजार रुपये खर्च आला. रिचेकिंगमध्ये तिला १०० गुण मिळाले,” असं सुप्रियाचे वडील चाज्जूराम यांनी सांगितलं.

हिसारमधील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या सुप्रियाचा शाळा सुरु झाल्यानंतर योग्य सत्कार केला जाईल असं शाळेचे मुख्याध्यापक ऋषिकेश खंडू यांनी सांगितलं आहे. “सुप्रिया ही खूप कष्ट करणारी आणि मनापासून अभ्यास करणारी विद्यार्थिनी आहे. तिने चांगले गुण मिळवले आहेत. शाळा सुरु झाल्यावर आम्ही तिचा सत्कार करणार आहोत,” असं खंडू म्हणाले.