गांधी कुटुंबाचे एसपीजी सुरक्षा कवच लवकरच काढण्यात येणार आहे. एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांची दोन मुले राहुल, प्रियंका गांधी वड्रा यांना आता झेड प्लस कॅटेगरीची सुरक्षा असेल. गांधी कुटुंबाला याबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही असे गांधी कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

नुकताच सुरक्षेसंदर्भातील आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. एसपीजी ही पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा संभाळणारी पहिली एलिट फोर्स आहे. यामध्ये ३००० अधिकारी आहेत. एसपीजीकडे आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. झेड प्लसमध्ये गांधी कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (सीआरपीएफ) असेल.

गांधी कुटुंबाचे एसपीजी सुरक्षा कवच काढण्याच्या निर्णयावरुन मोठा वाद होऊ शकतो. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची १९९१ साली हत्या झाली. तेव्हापासून गांधी कुटुंबाला एसपीजीचे सुरक्षा कवच आहे. पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी १९८५ साली एसपीजी स्थापना करण्यात आली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजीची स्थापना झाली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला १० वर्षापर्यंत सुरक्षा देण्यासाठी एसपीजी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली.