हवाई वाहतूक क्षेत्रातील स्पाईसजेट या विमान कंपनीने आपल्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रवाशांना स्वस्तात विमान प्रवास घडविण्याची घोषणा मंगळवारी केली. यामध्ये देशांतर्गत विमान प्रवासाचे किमान भाडे रुपये ५११ पासून सुरू होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे भाडे रुपये २१११ पासून (कर वेगळे) सुरू होणार आहे.
प्रवाशांना या ऑफरचा लाभ घेण्यासाठी मंगळवार ते गुरुवारी या तीन दिवसांत बुकिंग करायचे आहे. प्रवासी या ऑफरच्या साह्याने देशांतर्गत प्रवास १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत करू शकतील. तर आंतरराष्ट्रीय प्रवास १ जून ते २० जुलै २०१६ या कालावधीत करू शकतील, असे कंपनीने जाहीर केले आहे. सवलतीची तिकीटे मर्यादित प्रमाणात उपलब्ध असून, पहिला येणाऱ्यास पहिले तिकीट या आधारावर तिकीटे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
कालच एअर एशिया कंपनीने प्रवासी तिकिटांवर ५० टक्के सूट देण्याचे जाहीर केले होते. जे प्रवासी १८ मे पर्यंत बुकिंग करतील आणि रिटर्न तिकीट काढतील त्यांना ही सवलत देण्यात येणार आहे. १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या काळात प्रवाशांना या ऑफरच्या साह्याने प्रवास करता येणार आहे.