देशात करोनाचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. मागील काही दिवसांपासून दररोज 60 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहे. तर दुसरीकडे सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही करोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६६ हजार ९९९ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर ९४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिवसागणिक देशात करोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३८ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या देशात सहा लाख ५३ हजार ४२२ जणांवर उपचार सुरु आहेत. याच्या दुपटीपेक्षा जास्त रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत १६ लाख ९५ हजार ९८२ जणांनी करोनावर मात केली आहे.

(आणखी वाचा : वाईट बातमी! करोना बळींच्या संख्येत भारत जगात चौथ्या स्थानी)

देशात आतापर्यंत ४७ हजार ३३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता ब्रिटनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. भारताआधी अमेरिका, ब्राझील आणि मॅक्सीकोचा क्रमांक लागतो. १३ दिवसांपूर्वी इटलीला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकावर पोहचला होता. दररोज होणाऱ्या करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमुळे भारत आता चौथ्या स्थानावर पोहचला आहे. वर्ल्डोमीचरच्या आकडेवारीनुसार, भारतात ४७ हजारांपेक्षा जास्त जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्रीपर्यंत ब्रिटनमध्ये ४६ हजार ७०६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी भारताने ब्रिटनला मागे टाकत चौथा क्रमांक पटकावला आहे.


इतर देशांच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. भारताचा मृत्यूदर फक्त दोन आहे. तर यूकेचा मृत्यूदर १४.९ टक्के आहे. रुग्णांच्या मृत्यू संख्येबरोबरच भारत जगात करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी चौथ्या स्थानी असलेल्या ब्रिटनलाही भारतानं मागे सोडलं आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४६ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या क्रमवारीत अमेरिका (१ लाख ६८ हजार २१९), ब्राझील (एक लाख ३ हजार ९९), मेक्सिको (५३ हजार ९२९) आणि चौथ्या स्थानी भारत आहे.