कर्नाटकातील विजयपूर येथील ‘ज्ञान योगाश्रम’चे आध्यात्मिक गुरु सिद्धेश्वर स्वामी यांना जाहीर झालेला यंदाचा ‘पद्मश्री’ किताब त्यांनी नाकारला आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले असून आपण सन्यासी असल्याने हा प्रतिष्ठित पुरस्कार स्विकारता येणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.


‘सरकारचा मी आभारी आहे, कारण त्यांनी या प्रतिष्ठीत नागरी पुरस्कारासाठी माझी निवड केली. मात्र, तुमच्याप्रती आणि सरकारप्रती पूर्ण आदरभाव व्यक्त करीत मी नम्रपणे सांगू इच्छितो की हा पुरस्कार मला स्विकारता येणार नाही’ असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. मी सन्यास स्विकारला असल्याने पुरस्कारांमध्ये मला स्वारस्य नाही. हा मोलाचा पुरस्कार न स्विकारण्याच्या माझ्या निर्णयाचे तुम्ही स्वागत कराल, अशी अशा व्यक्त करतो असेही त्यांनी पंतप्रधानांना पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, २०१५ मध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारला होता. आपल्याला हा पुरस्कार खूपच उशीरा देण्यात आला उलट माझ्याबरोबरीने काम करणाऱ्यांना तो तुलनेने खूप आधीच देण्यात आल्याचे सलीम खान यांनी म्हटले होते. सिनेक्षेत्रातील माझे योगदान हे या पुरस्कारापेक्षा खूपच अधिक आहे. त्यामुळे मी हा पुरस्कार नाकारत आहे, अशी सडोतोड भुमिका सलीम खान यांनी मांडली होती.

यंदाच्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर २५ जानेवारी रोजी मोदी सरकारने पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली होती. ज्यांनी देशातील गरीबांसाठी मोफत शाळा सुरु केल्या तसेच आदिवासी कलेला जगभरात पोहोचवले अशांची यासाठी निवड करण्यात आली होती.

गेल्या वर्षीपासून मोदी सरकारने कधीही प्रसिद्धीच्याझोतात न आलेल्या मात्र, आपले जीवन गरीबांच्या सेवेसाठी आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘पद्म’ पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे.