पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ पुछं जिल्ह्यात आज (शुक्रवार) पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानी रेंजर्सने संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा तसेच छोट्या शस्त्रांद्वारे गोळीबार केला. याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले. मात्र, यामध्ये एक स्पेशल पोलीस ऑफिसर (एसपीओ) जखमी झाला आहे. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, सईद शाह असे या चकमकीत जखमी झालेल्या एसपीओंचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी शाहपूर आणि केणी सेक्टरमध्ये अचानक सीमेपलिकडून पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार सुरु झाला. यावेळी भारताच्या लष्करी तळांना तसेच दाट लोकसंख्या असलेल्या काही भागांना टार्गेट केले होते. यामध्ये केरनी, शाहपूर, क्वास्बा, गौंट्रिअन इत्यादी भागात गोळीबार करण्यात आला.

दरम्यान, संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्ट. कर्नल देवेंदर आनंद म्हणाले, पाकिस्तानकडून शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यांच्या या कृतीला भारतीय सैन्याने चोख आणि परिणामकारक प्रत्युत्तर दिले. दरम्यान, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सांबा जिल्ह्यातल्या रामगढ सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेनजीक एका पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतले आहे. येथील बालार्ड पोस्टजवळ हा नागरिक संशयास्पदरित्या हालचाल करताना आढळून आला होता.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातल्या बालाकोट येथे हल्ले केल्यानंतर सीमेवर तणावाचे वातावरण बनले असून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. बुधवारी राजौरी जिल्ह्यातील एका सरकारी शाळेजवळ झालेल्या स्फोटातून इथले विद्यार्थी आणि शिक्षक बचावले.