आमच्या संघाचे तीन क्रिकेटपटू स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकल्याचे कळल्यावर मला आणि संघातील सर्वांनाच तीव्र धक्का बसला. दुःख, नैराश्य आणि राग या सर्व भावना एकत्रितपणे सर्वांच्या मनात उचंबळून आल्या. गेला संपूर्ण आठवडा आमच्यासाठी खूप कठीण होता… ही प्रतिक्रिया आहे भारतीय क्रिकेट संघात ‘द वॉल’ म्हणून परिचित असलेला आणि राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू राहुल द्रविड याची. बुधवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर राहुल द्रविडने स्पॉट फिक्सिंग आणि त्यावरून गेल्या आठवड्यात घडलेल्या घडामोडींवर भाष्य केले.
मला अजिबात खोटं बोलायचं नाही, पण गेला आठवडा आमच्यासाठी खूप कठीण होता. संपूर्ण संघासाठी तो मोठा डाग होता. माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीमध्ये मी कधीच असा अनुभव घेतला नव्हता, असे राहुल द्रविडने पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून आमच्या संघातील तिघांना अटक केल्याचे समजल्यानंतर तो संपूर्ण दिवस आणि त्यानंतरचा आठवडा आमच्यासाठी अतिशय कठीण गेला. त्यानंतर आमचा सनरायजर्स हैदराबादबरोबरचा सामना होता. या सामन्यावेळी प्रत्येकजण तणावाखाली असल्याचे दिसत होते, असे द्रविड म्हणाला.
या परिस्थितीमध्ये जयपूर इथं दोन दिवस मुक्कामाला असताना आमच्या संघातील सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यात या विषयावर खुलेपणाने चर्चा झाली. प्रत्येकाने मनमोकळेपणाने आपले म्हणणे मांडले. संघातील प्रत्येकजण निर्भीडपणे आपले मत मांडत असल्याचे बघितल्यावर मला आनंद झाला. तणावातून बाहेर पडण्यासाठी आमच्यामधील त्या चर्चेचा खूपच फायदा झाला, असे द्रविड म्हणाला.