स्पॉट फिक्सिंगचा खटला न्यायालयात आणखी खंबीरपणे मांडण्यासाठी दिल्ली पोलिस राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू सिद्धार्थ त्रिवेदी याचा साक्षीदार म्हणून वापर करणार आहेत. 
स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांवरून दिल्ली पोलिसांनी एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या तीन क्रिकेटपटूंना १६ मे रोजी अटक केली. या प्रकरणी न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्यासाठी पोलिस गेल्या काही दिवसांपासून मेहनत घेताहेत. त्यातूनच सिद्धार्थ त्रिवेदी याला साक्षीदार म्हणून न्यायालयात बोलावण्याचा निर्णय झाल्याचे एका पोलिस अधिकाऱयाने सांगितले.
अजित चंडिलाने स्पॉट फिक्सिंग करण्याची गळ त्रिवेदी यालाही घातली होती. सट्टेबाजांनी या खेळाडूंसाठी आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये सहभागी होण्याचे त्याला निमंत्रण देण्यात आले होते. तसेच चंडिलाने त्याच्यासाठी महागड्या गिफ्टही देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, त्रिवेदीने या सगळ्याला स्पष्टपणे नकार दिला होता. आता त्याचाच उपयोग या तिन्ही खेळाडूंविरुद्धचा पुरावा म्हणून केल्यास हा खटला अधिक भक्कम होईल, असे पोलिसांचे मत आहे.
चंडिलाने ब्रॅड हॉज आणि केविन कूपर या परदेशी खेळाडूंनाही सट्टेबाजांनी आयोजित केलेल्या पार्टीला बोलावले होते. मात्र, त्यांनीही पार्टीला येण्यास नकार दिला होता.