आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या विषयावर थेटपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी नकार दिला. या प्रकरणी पोलिस तपास सुरू असल्याने कोणतीही प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असे डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी राजकारण आणि क्रीडा हे दोन्ही विषय एकत्रित केले जाऊ नयेत, अशीही अपेक्षा व्यक्त केली.
जपान आणि थायलंडच्या पाच दिवसांच्या दौऱयावरून परत येताना विशेष विमानात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर आता केंद्र सरकारने बीसीसीआयच्या कारभारात हस्तक्षेपण करण्याची वेळ आलीये का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना डॉ. सिंग यांनी वरील उत्तर दिले.