स्पॉट फिक्सिंगमुळे डागाळलेल्या आयपीएलला दररोज एका मागून एक धक्के बसत आहेत. आता आयपीएलचे प्रायोजकत्व घेतलेल्या कंपन्यांनीही यातून बाहेर पडण्याबद्दल विचार सुरू केला असल्याची माहिती मिळाली आहे. आयपीएलच्या यंदाच्या सिझनमधील महत्त्वाची प्रायोजक पेप्सीकोने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबरचा करार रद्द करण्याबद्दल विचार सुरू केलाय.
पेप्सीकोने ३९६.८ कोटी रुपयांना आयपीएलचे पाच वर्षांसाठी प्रायोजकत्व घेतले. या कराराचे हे पहिले वर्ष आहे. मात्र, स्पॉट फिक्सिंगचे आरोप आणि पुणे वॉरियर्सच्या मालकांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर आरोप करीत आयपीएलमधून घेतलेली माघार यामुळे बीसीसीआयबद्दल सामान्य क्रीडाप्रेमींमध्ये नकारात्मक भावना निर्माण झालीये. याचा प्रायोजकांच्या उत्पादनांवर आणि ब्रॅण्डवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे पेप्सीकोला वाटते. प्रायोजकत्वासाठी एवढी मोठी रक्कम भरून त्याचा नकारात्मक परिणाम झाल्यास कंपनीचा तोटा होईल, याचा विचार पेप्सोको कंपनीचे अधिकारी करताहेत.
नाव न छापण्याच्या अटीवर कंपनीचे एक अधिकारी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या प्रतिनिधीला म्हणाले, विविध आरोपांमुळे आयपीएलची विश्वासार्हता कमी होऊ लागलीये. त्याचवेळी आम्ही भरमसाठ पैसे देऊन आयपीएलचे प्रायोजकत्व घेतले आहे. गेल्यावेळी डीएलएफने प्रायोजकत्वासाठी २०० कोटी रुपये दिले होते. आम्ही जवळपास ४०० कोटी रुपये मोजले आहेत.
दरम्यान, कोणताही प्रायोजक सोडून जाऊ नये, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ प्रयत्नशील असल्याचे समजते.