स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एस. श्रीशांतने आयपीएलमध्ये कोणकोणत्या क्रिकेटपटूंना बुकींनी आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, याचा पाढाच पोलिसांपुढे वाचून दाखवला. क्रिकेटपटूंना महागाड्या कार आणि तरुणी पुरविण्याच्या अमिषाने स्पॉट फिक्सिंग करायला लावले जात होते, अशी ही माहिती श्रीशांतने पोलिसांना दिलीये.
गेल्या आठवड्यात स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सच्या श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी श्रीशांतकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने पोलिसांना फिक्सिंगबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बुकींनी काही क्रिकेटपटूंना हमर सारख्या महागड्या गाड्या बक्षीस म्हणून दिल्या आहेत. स्पॉट फिक्सिंगसाठी त्यांचे मन वळविण्यासाठी त्यांना महागडी घड्याळे, आणि पार्टीमध्ये तरुणीही पुरविण्यात येत होत्या, असे श्रीशांतने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी बुकींकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी या क्रिकेटपटूंसाठी वस्तू खरेदी केल्याची कबुली दिलीये. चंडिलाने बुकींच्या पैशावर अडीच लाख रुपयांच्या चार जीन्स आणि महागडी घड्याळे खरेदी केल्याचे सूत्रांनी सांगितले. याच पद्धतीने बुकी उर्वरित क्रिकेटपटूंना स्पॉट फिक्सिंगसाठी तयार करत होते, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.