स्पुटनिक ५ लस करोनावर ९५ टक्क्यांहून अधिक परिणामकारक असल्याचा दावा रशियाने मंगळवारी केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या लशीच्या एका मात्रेचा दर १० डॉलरहून कमी (जवळपास ७४० रुपये) असेल, असेही रशियाने म्हटले आहे.

या लशीची पहिली मात्रा दिल्यानंतर ४२ दिवसांनी ती लस टोचून घेणाऱ्यांबाबतची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली. त्यावरून ही लस ९५ टक्क्यांहून अधिक परिणामकारक असल्याचे सूचित होत आहे, असे गमेल्या राष्ट्रीय केंद्र आणि रशिया थेट गुंतवणूक निधीने (आरडीआयएफ) एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे. स्पुटनिक ५ ही दुहेरी मात्रा असलेली लस आहे.

ऑक्टोबर महिन्यात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी आणि आरडीआयएफला भारतात स्पुटनिक व्ही लशीची दुसऱ्या/ तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी करण्याची परवानगी भारताच्या औषध महानियंत्रकांनी दिली.

त्यानंतर २४ नोव्हेंबपर्यंत रशियातील २९ वैद्यकीय केंद्रांमध्ये २२ हजारांहून अधिक जणांना पहिली मात्रा देण्यात आली आणि १९ हजारांहून अधिक जणांना पहिली आणि दुसरी मात्रा देण्यात आली.