28 September 2020

News Flash

श्रीलंकेत आणखी १६ संशयितांना अटक

शोधमोहिमेसाठी श्रीलंकेतील अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीसाठी हजारो सैनिक तैनात केले आहेत

| April 26, 2019 02:43 am

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी पोलिसांनी जारी केलेली संशयित आरोपींची छायाचित्रे.

साखळी स्फोटांप्रकरणी शोधमोहीम तीव्र

कोलंबो : श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी लष्कराच्या मदतीने आपली मोहीम अधिकाधिक तीव्र करून स्फोट मालिकेप्रकरणी आणखी १६ संशयितांना अटक केली. ईस्टरचा सण साजरा केला जात असताना श्रीलंकेत आठ स्फोट घडविण्यात आले त्यामध्ये जवळपास ३६० जण ठार झाले तर ५०० हून अधिक जण जखमी झाले होते.

या स्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १६ संशयितांची दीर्घकाळ कसून चौकशी केली जात आहे. स्थानिक इस्लामिक दहशतवादी गट नॅशनल तौहीद जमातच्या (एनटीजे) नऊ आत्मघातकी हल्लेखोरांनी गेल्या रविवारी चर्च आणि आलिशान हॉटेलांमध्ये स्फोट घडविले होते. गुरपुवारी आणखी १६ संशयितांना अटक करण्यात आल्याने या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची संख्या आता ७६ झाली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी बहुसंख्य जण एनटीजेशी संबंधित आहेत. मात्र एनटीजेने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या स्फोटांची जबाबदारी आयसिसने स्वीकारली असून आत्मघातकी हल्ल्यात कोणते दहशतवादी सहभागी झाले होते त्यांची नावेही जाहीर केली आहेत.

शोधमोहिमेसाठी श्रीलंकेतील अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीसाठी हजारो सैनिक तैनात केले आहेत. देशभरामध्ये जवळपास पाच हजार सैनिक तैनात करण्यात आले असून त्यामध्ये हवाई दलाचे एक हजार आणि नौदलाच्या ६०० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. श्रीलंकेत गेल्या २४ तासांमध्ये कोणतीही मोठी घटना घडलेली नाही.

न्यायालयाजवळ स्फोट

दरम्यान, पुगोडा येथील दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयामागे किरकोळ स्वरूपाचा एक स्फोट झाल्याचे वृत्त आहे. मात्र त्यामध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही. सदर स्फोट कचराकुंडीत झाला, सदर स्फोट निश्चित कशामुळे झाला त्याचा शोध घेण्यात येत आहे.

स्फोटात मरण पावलेल्या भारतीयांची संख्या ११

कोलंबो : श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांमध्ये ठार झालेल्या भारतीयांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे. या स्फोटांमध्ये जखमी झालेला आणखी एक भारतीय गुरुवारी मरण पावला, असे श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. या हल्ल्यात ठार झालेल्या परदेशी नागरिकांची संख्या आता ३६ झाली आहे. त्यामध्ये चीन (२), भारत (११), डेन्मार्क (३), जपान (१), नेदरलॅण्ड्स (१), पोर्तुगाल (१), सौदी अरेबिया (२), ब्रिटन (६), अमेरिका (१) आदींचा समावेश आहे.

ड्रोन, मानवरहित विमानांवर बंदी

कोलंबो : श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांनंतर प्रशासनाने ड्रोन आणि मानवरहित विमानांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत ही बंदी जारी ठेवण्यात येणार असल्याचे नागरी उड्डाण प्राधिकरणाने म्हटले आहे. श्रीलंकेच्या हवाई हद्दीमध्ये ड्रोन आणि मानवरहित विमानांवर तात्पुरती बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. देशातील सुरक्षेची सध्याची स्थिती लक्षात घेऊन या उपाययोजना आखण्यात येत आहेत, असेही प्राधिकरणाने म्हटले आहे.

मुस्लिमांचा मशिदी, पोलीस ठाण्यांत आश्रय 

कोलंबो : श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी चर्च आणि हॉटेलांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर असुरक्षित वाटू लागलेल्या शेकडो मुस्लिमांनी येथील मशिदी आणि पोलिस ठाण्यांमध्ये आसरा घेतला आहे. दहशतवाद्यांनी घडवलेल्या या आत्मघाती हल्ल्यांमध्ये ३५९ जणांचा मृत्यू ओढवला आहे. यात सेंट सेबॅस्टियन चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमलेल्या शंभर ख्रिस्ती व्यक्तींचा समावेश आहे. नेगोम्बो परिसरात स्थायिक झालेल्या अनेक अहमदी मुस्लिमांना तेथील जमीनमालकांनी हुसकावून लावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. इतर देशांतून निर्वासित म्हणून आलेले हे लोक आता पुन्हा येथे निर्वासित झाले आहेत, असे स्थानिक मानवाधिकार कार्यकर्ते रुकी फर्नान्डो यांनी सांगितले.

हल्लेखोरांच्या वडिलांना अटक

कोलंबो : श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट घडविण्यासाठी आपल्या दोन आत्मघातकी मुलांना सहकार्य केल्याच्या संशयावरून श्रीलंकेतील मसाल्याच्या एका बडय़ा व्यापाऱ्याला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. सदर व्यापाऱ्याचे नाव मोहम्मद युसुफ इब्राहिम असे असून इल्हाम अहमद इब्राहिम आणि इस्मत अहमद इब्राहिम या त्याच्या दोन मुलांनी शांग्री-ला आणि सिनामोन ग्रॅण्ड हॉटेलांमध्ये स्फोटकांचा स्फोट घडविले. मोहम्मद युसुफ इब्राहिम यांनी मुलांना स्फोट घडविण्यासाठी सहकार्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

श्रीलंकेतील ‘आगमन व्हिसा’ योजना स्थगित

कोलंबो : जवळपास ३९ देशांमधील नागरिकांना श्रीलंकेत आल्यावर व्हिसा देण्याची योजना स्थगित करण्याचा निर्णय श्रीलंकेने गुरुवारी घेतला. सदर ३९ देशांमधील नागरिकांना येथे आल्यानंतर व्हिसा देण्याची योजना अस्तित्वात असली तरी देशातील सध्याची स्थिती लक्षात घेऊन आम्ही ती तूर्त स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे श्रीलंकेचे पर्यटनमंत्री जॉन अमरतुंगा यांनी येथे स्पष्ट केले. श्रीलंकेत घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये परदेशी शक्तींचा हात असल्याचे स्पष्ट झाल्याने या सुविधेचा गैरवापर होऊ नये अशी आमची इच्छा असल्याचे अमरतुंगा म्हणाले. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी देशात आल्यावर व्हिसा देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 2:43 am

Web Title: sri lanka attacks sri lankan authorities continue search for terror suspects
Next Stories
1 निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा मांडण्याचे मोदी यांच्याकडून समर्थन
2 निवडणुकीनंतर ‘नमो-नमो’ जयघोष बंद होईल – मायावती
3 मोदी-शहा सत्तेवर आले, तर जबाबदार फक्त राहुलच
Just Now!
X