श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो शहरातील आठ बॉम्बस्फोटांची घटना ताजी असतानाच आता कोलंबोपासून ४० किलोमीटर असलेल्या पुगोडा हे शहर स्फोटांच्या आवाजाने हादरले आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, हे बॉम्बस्फोटच आहेत का, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोलंबोपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या पुगोडा येथे गुरुवारी सकाळी स्फोटांचा आवाज आला. हा आवाज इतका जोरदार होता की परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले. आवाज येताच पोलीस आणि अन्य यंत्रणांनी परिसराच्या दिशेने धाव घेतली. स्फोट नेमका कशाचा झाला, याचा पोलीस तपास करत आहेत.

कोलंबोत रविवारी ईस्टरच्या सणावेळी चार आलिशान हॉटेल्स आणि दोन चर्चमध्ये सकाळी ८.४५ वाजता दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला. दहशतवाद्यांनी एकूण आठ बॉम्बस्फोट घडवले. या स्फोटांमध्ये ३०० अधिक लोकांचा मृत्यू झाला. आयसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुगोडात ही घटना घडल्याने श्रीलंकेतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.