News Flash

Sri Lanka Bomb blasts : श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवणारी संघटना तामिळनाडूतही सक्रीय ?

ही संघटना श्रीलंकेच्या पूर्व भागात सक्रीय असून शरीया कायदा लागू करणे, महिलांसाठी बुरख्याची सक्ती, अशी या संघटनेची भूमिका आहे.

blasts :संग्रहित छायाचित्र

Sri Lanka Bomb blasts: दहा वर्षे शांत असलेले श्रीलंका रविवारी आठ बॉम्बस्फोटांनी हादरले असून या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. तौहीद जमात या कट्टरतावादी मुस्लीम संघटनेचे नाव या बॉम्बस्फोटानंतर चर्चेत आले असून या संघटनेची शाखा तामिळनाडूमध्येही सक्रीय आहे. या बॉम्बस्फोटामागे तौहीद जमातचा हात असू शकते, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

श्रीलंकेत यापूर्वी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमने (एलटीटीई) आत्मघाती हल्ले घडवले होते. मात्र, २००९ मध्ये या संघटनेचा दहशतवाद नष्ट करण्यात श्रीलंकेला यश आले होते. रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटाचे स्वरुप पाहता आयसिस किंवा त्यांच्या एखाद्या गटाचे कृत्य असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यात तौहीद जमात या दहशतवादी संघटनेचाही समावेश आहे. ही संघटना श्रीलंकेच्या पूर्व भागात सक्रीय असून शरीया कायदा लागू करणे, महिलांसाठी बुरख्याची सक्ती, अशी या संघटनेची भूमिका आहे. त्यामुळे तौहीद जमात ही संघटनाही श्रीलंकेतील तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. या संघटनेने यापूर्वी बौद्ध धर्माविरोधातही कारवाया केल्या होत्या. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या संघटनेची एक शाखा तामिळनाडूमध्येही सक्रीय असल्याने भारतातील यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.

श्रीलंकेत झालेले बॉम्बस्फोट आणि २०१६ मध्ये बांगलादेशमधील ढाका येथे बेकरीत झालेले आत्मघाती बॉम्बस्फोट यात साम्य असल्याचे सांगितले जाते. बांगलादेशमधील बॉम्बस्फोटही स्थानिक तरुणांनीच घडवले होते. मात्र त्या तरुणांना आयसिसने प्रशिक्षण दिले होते. श्रीलंकेत नेमक्या कोणत्या संघटनेने स्फोट घडवले हे सखोल तपासानंतरच उघड होईल, असे तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. कट्टरतावादी मुस्लीम संघटना आणि दहशतवादी संघटनांनी श्रीलंकेत जाळे तयार केल्याचे या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे.

प्राथमिक तपासात असे दिसते की या हल्ल्यामागे श्रीलंकेतील कट्टरतावादी संघटनेचा हात असावा. पण दहशतवादासंदर्भातील अभ्यासकांच्या मते हल्ल्याचे स्वरुप पाहता हा हल्ला परकीय शक्तींच्या मदतीशिवाय घडवणे अशक्य आहे. स्थानिक संघटनांनी परकीय शक्तींच्या मदतीने हा हल्ला घडवल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2019 9:08 am

Web Title: sri lanka bomb blasts thowheed jamaat on suspect list active in tamilnadu
टॅग : Bomb Blast
Next Stories
1 दहशतवादी कारवायांसाठी हैदराबाद सुरक्षित ठिकाण: भाजपा खासदार
2 उपाशी पोटाचे शाप साध्वीपेक्षा प्रखर, मोदींनी इंदिरा गांधींसारखी दूरदृष्टी दाखवावी: शिवसेना
3 Colombo serial blast : १३ जणांना अटक; कोलंबो विमानतळावर घातपात टळला
Just Now!
X