श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणणाऱ्या दहशतवादी संघटनेची ओळख पटली असून तौहीद जमात या स्थानिक दहशतवादी गटावर संशय आहे. ईस्टर संडेला घडवून आणलेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये २९० निष्पाप नागरीकांचा मृत्यू झाला. ५०० जण जखमी झाले. श्रीलंकेच्या इतिहासातील हा भीषण दहशतवादी हल्ला आहे.

स्फोटामध्ये सहभागी असलेले सर्व आत्मघातकी हल्लेखोर श्रीलंकन नागरीक होते अशी माहिती सरकारचे प्रवक्ते आणि श्रीलंकेचे आरोग्य मंत्री रंजिता सेनारत्ने यांनी दिली. राष्ट्रीय गुप्तचर प्रमुखांनी आयजीपीना ११ एप्रिलपूर्वी हल्ला होऊ शकतो असा अलर्ट दिला होता असे सेनारत्ने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत सोमवारी मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू करण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी केली. एकीकडे ही घोषणा केली जात असतानाच श्रीलंकेतील पोलिसांनी कोलंबो येथील बस स्थानक परिसरातून तब्बल ८७ डिटोनेटर्स जप्त केले आहेत.

कोलंबो शहर रविवारी आठ बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. चार आलिशान हॉटेल आणि दोन चर्चमध्ये घडवण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात २९० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ५०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी मध्यरात्रीपासून देशात आणीबाणीची घोषणा केली. दहशतवादी कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी आणीबाणी लागू केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दहशतवादाविरोधात कारवाईसाठी हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार नाही, असे श्रीलंकेतील सरकारने स्पष्ट केले.