श्रीलंकेचे पोलिस प्रमुख जयसुंदरा यांचा राजीनामा

आयसिसशी संबंधित जवळपास १३० हून अधिक संशयितांच्या श्रीलंकेमध्ये कारवाया सुरू असल्याचे शुक्रवारी अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांनी सांगितले. श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्यानंतर सिरिसेना यांनी ही माहिती दिली आहे.

रविवारी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक संशयितांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे, श्रीलंकेतून दहशतवाद्यांच्या जाळ्याचा संपूर्ण नायनाट केला जाईल, असे सिरिसेना म्हणाले. आयसिसशी संबंधित १३०-१४० जणांच्या श्रीलंकेत कारवाया सुरू आहेत, अशी माहिती मिळाली आहे, जवळपास ७० जणांना अटक करण्यात आली आहे, सर्वाना लवकरच अटक केली जाईल आणि दहशतवादाचा नायनाट केला जाईल, असे सिरिसेना म्हणाले.

दरम्यान, इस्टर सणावेळी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी संरक्षण सचिव व पोलिस प्रमुख यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शुक्रवारी पोलिस प्रमुख पुजिथ जयसुंदरा यांनी राजीनामा दिला आहे.

सिरीसेना हे संरक्षणमंत्रीही आहेत. त्यांच्या आदेशानुसार पोलिस महानिरीक्षकांनी त्यांचा राजीनामा हंगामी संरक्षण सचिवांकडे पाठवला आहे. नवीन पोलिस महानिरीक्षकांची नियुक्ती लवकरच केली जाईल, असे सिरीसेना यांनी म्हटले आहे. रविवारच्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षण सचिव हेमासिरी फर्नाडो यांनी त्यांचा राजीनामा कालच अध्यक्षांना सादर केला होता. जयसुंदरा व फर्नाडो या दोघांनाही अध्यक्ष सिरीसेना यांनी राजीनामा देण्यास सांगितले होते.

श्रीलंकेतील सुरक्षा व्यवस्थेने हल्ल्यांबाबत पूर्वसूचना असतानाही हे प्रकरण बेजबाबदारपणे  हाताळले असा आरोप आहे. मित्र देशांच्या गुप्तचरांनी याबाबत धोक्याच्या सूचना देऊनही ती माहिती आपल्यापर्यंत अधिकाऱ्यांनी पोहोचवली नाही, असे सिरीसेना यांचे म्हणणे आहे. जयसुंदरा व फर्नाडो यांना त्यांच्याकडे असलेली माहिती न देण्याबाबत विचारले असता ते गप्प राहिले, असेही त्यांनी सांगितले.

सरकारने सुरक्षा संस्थांना कमकुवत केले असून लष्करी गुप्तचर यंत्रणाही त्याला अपवाद नाही. आता लवकरच दहशतवादाचा सामना करण्यासाठी संयुक्त विभाग स्थापन करण्यात येईल, नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक घराची झडती घेतली जाईल. श्रीलंकेला या हल्ल्याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे पण सिरीसेना व पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी ही माहिती अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलीच नाही असे म्हटले आहे. इस्टर सणावेळी तीन चर्च व तीन हॉटेलांमध्ये नऊ हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट केले होते.

हल्ल्यावेळी आयसिसचा नेता हाशीम ठार

कोलंबो : श्रीलंकेतील इस्लामी दहशतवादी झहरान हाशीम हा आयसिसच्या स्थानिक गटाचा वरिष्ठ नेता असून तो ईस्टर सणावेळी रविवारी करण्यात आलेल्या हल्ल्यात शांग्रिला हॉटेलमध्ये मारला गेला, असे अध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी सांगितले.  हाशिम हा नॅशनल तौहीद जमात या स्थानिक गटाचा नेता असून त्याने या हॉटेलमधील हल्ल्यांचे नेतृत्व केले होते. त्याच्या समवेत इलहम अहमद इब्राहिम हा दुसरा दहशतवादीही होता, ते दोघेही आत्मघाती स्फोटात ठार झाले आहेत. अध्यक्ष सिरीसेना यांच्या मते लष्करी गुप्तचरांच्या माहितीनुसार हे दोघे मारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. आयसिसने एक चित्रफीत जारी केली असून त्यात हाशिम दिसत आहे, पण नंतर त्याचा ठावठिकाणा समजू शकला नाही. गोल चेहऱ्याच्या हाशिम याने काळे कपडे घातलेले होते. त्याच्याकडे रायफल होती. देशातील धर्मगुरू असलेल्या या दहशतवाद्याबाबत नेहमीच सावधानतेचा इशारा दिला जात होता, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आयसिसच्या चित्रफितीत ईस्टर रविवारी झालेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.  हाशिम हा ४० वर्षांचा असून एकटाच राहात होता. तो मूळ बट्टीकलोवाचा असून मध्यमवर्गीय मुस्लीम होता. हाशिम याने श्रीलंका, तामिळनाडू व केरळातील मुस्लिमांना इस्लामी राजवट स्थापन करण्याचे आवाहन ध्वनिफितींमधून केले होते, असे भारताच्या एनआयए या तपास संस्थेनेही म्हटले होते.