श्रीलंकेचे पंतप्रधान राणील विक्रमसिंघे आजपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज संध्याकाळी ते राजधानी दिल्लीमध्ये पोहोचले. माध्यमांमध्ये आलेल्या वादग्रस्त विधानादरम्यान विक्रमसिंघे यांचा हा दौरा होत आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती मत्रिपाल सिरीसेना यांनी भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ वर श्रीलंकन पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता, असं वृत्त माध्यमांमध्ये आलं होतं. मात्र, श्रीलंका सरकारच्या अधिकृत सुत्रांकडून हे चुकीचे वृत्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे विक्रमसिंघे यांच्या या दौऱ्याला वेगळं महत्त्व आहे. दुसरीकडे, ‘रॉ’ वर आपण आरोप केलेले नाहीत. हा खोडसाळपणाचा आणि चुकीचा प्रकार असल्याचं स्वतः सिरीसेना यांनी बुधवारी मोदींना फोन करुन सांगितलं आहे.


नियोजित दौऱ्यानुसार विक्रमसिंघे हे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. श्रीलंकेतील जाफना येथे भारताच्या पुढाकाराने सुरू झालेल्या गृहनिर्माण प्रकल्पासंदर्भात दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये सविस्तर चर्चा होईल अशी माहिती आहे. याशिवाय तामिळ विस्थापितांच्या विषयावरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, यावेळी श्रीलंकेचे पंतप्रधान भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेणार आहेत.