श्रीलंकेच्या संरक्षण खात्याच्या संकेतस्थळावर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरोधात आक्षेपार्ह व प्रक्षोभक मजकूर प्रसिद्ध झाल्याच्या मुद्दय़ावरून शुक्रवारी देशभर खळबळ उडाली. तामिळनाडूतील सर्वच राजकीय पक्षांनी जयललितांची बाजू घेत श्रीलंकेच्या या कृत्यावर टीकेची झोड उठवली. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी तातडीने माफी मागून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
श्रीलंकेच्या संरक्षण खात्याच्या संकेतस्थळावर जयललितांवर टीका करणारा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘जयललिता पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहीत असलेली पत्रे किती आशयघन असतात’, असे या लेखाचे शीर्षक आहे.
श्रीलंकेच्या सागरी हद्दीत घुसखोरी करणाऱ्या तमीळ मच्छीमारांची सुटका करण्याबाबत तसेच श्रीलंकेशी असलेल्या संबंधांबाबत पुनर्विचार करण्याचा आग्रह करण्याविषयी जयललिता मोदी यांना पत्र लिहीत असल्याचा या लेखात उल्लेख आहे, शिवाय जयललितांवर असभ्य शब्दांत टीकाही करण्यात आली आहे.
 हा लेख प्रसिद्ध होताच त्याचे तीव्र पडसाद तामिळनाडून उमटले. जयललितांचे कट्टर विरोधकही या मुद्दय़ावर एकवटले व त्यांनी श्रीलंकेच्या या कृतीचा निषेध केला. जयललितांवर झालेली टीका सभ्यतेच्या मर्यादा उल्लंघून केलेली आहे. हा भारताचाच अपमान असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत जयललितांचा सत्ताधारी पक्ष अण्णाद्रमुकने तातडीने श्रीलंकेने या संदर्भात भारताची माफी मागावी, अशी मागणी केली.
केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्ष असलेल्या डीएमकेनेही श्रीलंकेच्या या कृत्यावर टीका केली, तर करुणानिधींच्या द्रमुकनेही श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्यावर तोंडसुख घेतले. केंद्र सरकारनेही या कृत्याची दखल घेत श्रीलंकेच्या दूतावासाकडे निषेध नोंदवला. यानंतर राजपक्षे यांनी झाल्या प्रकाराबद्दल भारताची माफी मागितली.