श्रीलंकेत दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लीमविरोधी दंगलीच्या घटना घडत असताना श्रीलंकेतील लष्कराने याविरोधात सोशल मीडियावर मोहीमच सुरु केली आहे. श्रीलंकेतील जनतेसाठी सैन्याने २० मेसेज तयार केले असून हे मेसेजेस जास्तीत जास्त लोकांनी शेअर करावेत, असे आवाहन श्रीलंकेतील सैन्याने केले आहे.

श्रीलंकेत २१ एप्रिलला इस्टर रविवारी झालेल्या बॉम्बहल्ल्यात २६० जण मरण पावल्यानंतर अजूनही तेथील ख्रिश्चन-मुस्लीम तणाव कायम आहे. याशिवाय सिंहली- मुस्लीम यांच्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यासाठी फेसबुक आणि व्हॉट्स अॅप कारणीभूत ठरत असल्याचे लक्षात येताच श्रीलंकेत सोशल मीडियावर निर्बंध घालण्यात आले होते. आता श्रीलंकेच्या सैन्याने सोशल मीडियामुळे तणाव निर्माण होऊ नये यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी २० मेसेजच तयार करण्यात आले असून प्रत्येकाने हे मेसेज सोशल मीडियावर आवर्जून शेअर करावं, असं आवाहन सैन्यातर्फे करण्यात आले.

काय आहेत मेसेज ?
सिंहली लोकांनी मुस्लीम समाजाला लक्ष्य करावं हा दहशतवाद्यांचा अजेंडा होता, दहशतवादी आता बॉम्बस्फोट घडवू शकत नाही, कारण सुरक्षा दलांनी त्यांच्यावर लगाम घातला आहे, दोन समाजात तेढ निर्माण करुन दहशतवादी त्यांचा हेतू साध्य करु इच्छितात, दहशतवाद्यांच्या हातचे खेळंण होण्याऐवजी हुशार व्हा, ‘तुम्ही समाजाला उद्ध्वस्त करु शकत नाही’ या विचारानेच दहशतवाद्यांचे डाव हाणून पाडता येतील, श्रीलंकेतील मुस्लीम बांधवांनी दहशतवादाला नाकारले आहे, हातात काठी आणि दगड घेऊन मुस्लीम वस्त्यांवर हल्ला करुन आपण अप्रत्यक्षपणे आयसिसला तर मदत करत नाही ना?, असे या मेसेजेसमध्ये म्हटले आहे.