लोकप्रियतेत घट होण्याची भीती आणि अधिकार कमी करण्याच्या मागणीच्या पाश्र्वभूमीवर श्रीलंकेचे अध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांनी तिसऱ्यांदा सत्तारूढ होण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी गुरुवारी मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली.
राजपक्षे हे सन २००५ व २०१० मध्ये निवडून आले असून विद्यमान अध्यक्षपदाची मुदत २०१५ मध्ये संपत असताना, त्याआधीच त्यांनी मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली. आपण एक गौप्यस्फोट करीत असून तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी मध्यावधी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. ही लोकशाही आहे, असे ६९ वर्षीय राजपक्षे यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाचे आयुक्त महिंद्र देशप्रिय यांनीही, अध्यक्षांचा अध्यादेश प्राप्त झाल्याच्या माहितीस दुजोरा देत आता उमेदवारी अर्जासंबंधीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगितले. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात निवडणुका होण्याची शक्यता आहे, असे समजते.